अंधेरीला औषध आणायला चाललोय; वाहनचालकांच्या बहाण्यांनी पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:10 AM2020-06-30T04:10:10+5:302020-06-30T04:10:31+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना नियंत्रणात आणण्यासाठी २ किलोमीटरची लक्ष्मणरेषा पोलिसांकडून आखण्यात आली आहे. असे असूनही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली हजारो लोक वाहने घेऊन बाहेर पडले.

We are going to bring medicine to Andheri; Police were also harassed under the pretext of driving | अंधेरीला औषध आणायला चाललोय; वाहनचालकांच्या बहाण्यांनी पोलीसही हैराण

अंधेरीला औषध आणायला चाललोय; वाहनचालकांच्या बहाण्यांनी पोलीसही हैराण

Next

मुंबई : ‘साब, मीरा रोड से आया हु, अंधेरी जा रहा हु, दवाई लाने’, असे कारण एका कारचालकाने पोलिसांना दिले. मीरा रोडमध्ये एकही दुकान सापडले नाही का, असे विचारल्यावर चालकाची बोलती बंद झाली आणि पोलिसांनी त्याची कार ताब्यात घेतली. गेल्या दोन दिवसात चालकांकडून दिल्या जाणाऱ्या अशाच बहाण्यांनी पोलीस हैराण झाले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना नियंत्रणात आणण्यासाठी २ किलोमीटरची लक्ष्मणरेषा पोलिसांकडून आखण्यात आली आहे. असे असूनही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली हजारो लोक वाहने घेऊन बाहेर पडले. त्यातील ज्यांना पोलिसांनी अडवत कारण विचारले त्यातील एकाने मीरा रोडवरून अंधेरीला औषध आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. तेव्हा मीरा रोडमध्ये औषधांची दुकानेच नाहीत का, असा उलटप्रश्न पोलिसांनी केल्यावर तो शांत झाला. तर अनेकांनी नातेवाइकाचे निधन झाल्याचे कारण पुढे केले. काही जणांनी रुग्णासोबत कंपनी द्यायला जात असल्याचेही पोलिसांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. उत्तर मुंबईत जसे रिकामी पिशवी घेऊन विनाकारण फिरत राहण्याचे प्रकार घडत होते, तसेच आता दुचाकी आणि चारचाकी घेऊन लोक बाहेर पडत असल्याचे अनेक प्रकार पाहण्यात येत आहेत.

कोरोनाबरोबर जगायला शिका, कामावर जा...अशी एकीकडे दूरदर्शनवरून शिकवण द्यायची. ९० टक्के लोक पोटापाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आपली वाहने घेऊन बाहेर पडल्यावर रस्त्यावर उभे राहून कायद्याचा बडगा दाखवत वाहतूक पोलिसांकडून अव्वाच्या सव्वा दंडवसुली करून वाहनचालकांची लुबाडणूक सुरू झाली आहे. नियोजन शून्य वाहतूक व्यवस्थापनामुळे तासन्तास गाड्यांचा खोळंबा होत आहे तो वेगळाच. यामुळे सरकारला नक्की काय साध्य करायचे आहे ते मुख्यमंत्री महोदयांनी एकदा स्पष्ट करावे.
- सुधीर परांजपे, बोरीवली (पूर्व)

आज आम्ही लोअर परळ येथील कार्यालयात जाण्यासाठी सकाळी ६.३० ते ६.४५ दरम्यान घर सोडले. मात्र दहिसर चेकनाक्यापूर्वी व नंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर उड्डाणपूल सुरू व्हायच्या आधी किंवा नंतर गाड्या अडवून पोलीस तपासणी केली जायची. लोअर परळला पोहोचायला आज सकाळी ११ वाजले. नागरिकांना याची जर पूर्वकल्पना दिली असती तर त्यांचे इतके हाल झाले नसते आणि त्यांचा विनाकारण वेळ गेला नसता.आता परत अशी नाकाबंदी कधी करणार याची पूर्वसूचना संबंधित यंत्रणेने द्यावी ही अपेक्षा. - भूषण म्हात्रे, वसई

नाक्यानाक्यावर सुरू असलेल्या वाहनांच्या पोलीस तपासणीमुळे नागरिकांचे खूप हाल झाले. त्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे व विशेष करून उपचारांसाठी इस्पितळात जाणाºया रुग्णांचे व त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले. पोलिसांनी अचानक नाकाबंदी करण्यापूर्वी नागरिकांना कल्पना द्यायला हवी होती. अन्यथा लॉकडाऊन वाढवण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कालच्या ४७ मिनिटांच्या भाषणात मुंबईतील जनतेला स्पष्ट सांगायचे होते. आजचा प्रकार म्हणजे आधीच लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. - पराग चुरी, गोरेगाव

मी मेडिकलमध्ये काम करते. वाहतूक कोंडीचा फटका बसला. प्रभादेवी ते विक्रोळी अंतर कापण्यास दोन तास गेले. दररोज अशाप्रकारे वाहतूक कोंडी होत राहिली तर सामान्य माणसांनी काय करायचं. - साधना पवार, दुचाकीस्वार, प्रभादेवी

पोलिसांच्या कारवाईमुळे आज वाहतूक कोंडीत वेळ गेला. परंतु विनाकारण घराबाहेर पडणाºया लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांच्या कारवाईला पूर्ण पाठिंबा आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे बंद केले पाहिजे.- दर्शना शिंदे, चेंबूर

पोलिसांनी बदल केलेल्या या नियमांबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. सकाळी माज्या दुचाकीवर बहिणीला आॅफिसला सोडण्यासाठी गेलो होतो. पोलिसांनी मला अडवून माज्यावर डबलसीट गाडी चालविल्याने कारवाई केली. आधीच लॉकडाउनमुळे कंपनी कमी पगार देत आहे त्यात पोलिसांनी माझ्याकडून २२०० रुपये दंड घेतला. - निलेश जोशी, दुचाकीस्वार, घाटकोपर

खासगी कामानिमित्त मानखुर्दहून चेंबूरला जात होतो. सकाळपासूनच सायन-पनवेल मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वेळ प्रचंड वाया गेला. गाडीत एकूण चार व्यक्ती होत्या यामुळे पोलिसांनी कारवाई केली. - दिलीप पाटील, कार चालक, मानखुर्द

सोमवारच्या वाहतूक कोंडीमुळे आॅफिसला उशिरा पोहोचलो. शासनाने बस, एसटी आणि ट्रेन सुरू केल्यापासून प्रवासी त्यात गर्दी करून प्रवास करत आहेत. यामुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची देखील शक्यता आहे. मग पोलीस कारवाई फक्त खाजगी वाहनांवरच का करत आहेत?. ट्रेन आणि बस मधील गर्दी कमी करण्यासाठी देखील शासनाने उपाय करायला हवेत. - मयूर पारकर, दुचाकीस्वार, चुनाभट्टी

Web Title: We are going to bring medicine to Andheri; Police were also harassed under the pretext of driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.