लज्जास्पद! मुंबईत मास्क घातलं नसल्यानं केली विचारणा; महिलेनं केली BMC कर्मचाऱ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 14:08 IST2021-03-20T14:08:51+5:302021-03-20T14:08:51+5:30
Coronavirus Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. लोकांचा हलगर्जीपणा यामागील मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

लज्जास्पद! मुंबईत मास्क घातलं नसल्यानं केली विचारणा; महिलेनं केली BMC कर्मचाऱ्याला मारहाण
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांचा हलगर्जीपणा यामागील मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु मुंबईतील कांदिवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं रस्त्यावर फिरताना मास्क घातलं नव्हतं. म्हणून मुंबई महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यानं त्यांना थांबवलं. परंतु यानंतर त्या महिलेनंच पालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.
यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत सदर महिला ही विना मास्क रिक्षात बसताना दिसत आहे. यादरम्या मुंबई महापालिकेनं तैनात केलेल्या महिला कर्मचाऱ्यानं त्यांना रोखून मास्क घालण्यास सांगितलं. त्यानंतर अचानक त्या महिलेनं पालिका कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली. यानंतरही कर्मचारी महिलेनं सदर महिलेला मास्क घालण्यास सांगितलं. परंतु महिलेनं त्यांना मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
लग्नसराई, लोकलमुळे कोरोना वाढल्याचा निष्कर्ष
कोरोनाविषयी लोकांच्या मनात नसलेली भीती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका, तसंच लोकलसह सार्वजनिक वाहतूक सेवेतून लोकांचा वाढलेला प्रवास या गोष्टींमुळे महाराष्ट्रात पुन्हा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे, असा अहवाल केंद्र सरकारनं पाठविलेल्या तज्ज्ञांच्या पथकानं आपल्या दौऱ्यानंतर सादर केला होता. याच वेळी त्यांनी कोरोना चाचण्या करणारी आरोग्य यंत्रणा सुस्तावल्याचा ठपकाही ठेवला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या तज्ज्ञ पथकाने १ व २ मार्च रोजी महाराष्ट्राचा दौरा करून कोरोना स्थितीची पाहणी केली. या समितीने अहवालात म्हटले आहे की, सध्या लग्नसराईचे दिवस, सभासमारंभ सुरू आहेत. अशा गोष्टींतून महाराष्ट्रात पुन्हा कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणं, रुग्णांचा वेगाने शोध घेणं, नियमांची अंमलबजावणी करणं यापुढेही सुरू ठेवावं अशा सूचना या अहवालात केल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांसाठी लोक स्वत:हून पुढे येण्याचं प्रमाणही कमी आहे. सप्टेंबरनंतर कोरोना साथीचा जोर कमी झाल्यानं आरोग्य यंत्रणाही सुस्तावली आहे. याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढला आहे.
(टीप : व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह भाषा असल्यामुळे व्हिडीओ बातमीसोबत जोडण्यात आलेला नाही.)