सावधान... साचलेल्या पाण्यातून चालताय; लेप्टोची लागण होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:58 IST2025-05-27T12:58:11+5:302025-05-27T12:58:31+5:30
वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत

सावधान... साचलेल्या पाण्यातून चालताय; लेप्टोची लागण होण्याची भीती
मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात होते. अशात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालत असाल तर लेप्टोस्पायरोसिस हाेण्याचा धोका असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले. कारण या साचलेल्या पाण्यात उंदराचे मलमूत्र मिसळलेले असते. त्यामुळे शरीरावरील विशेषत: पायावर असलेली जखम अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पयारोसिस होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये, असे वैद्यकीयतज्ज्ञ सांगत असतात.
मुंबई महापालिका दरवर्षी रस्त्यावर पाणी तुंबू नये म्हणून विशेष प्रयत्न करत असते. मात्र, अनेक उपाययोजना करूनही पाणी साचत असल्याने नागरिकांना त्या पाण्यातून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. या काळात घुशी, उंदीर बाहेर आलेले असतात. त्यांच्या मलमूत्रामुळे या पाण्यातून लेप्टोस्पयारोसिसचा संसर्ग नागरिकांना होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
काय आहेत लक्षणे?
ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्राव आदी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यावर योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो.
साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
काय काळजी घ्याल?
पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून चालू नये. जर चाललात, तर गुडघ्यापर्यंत गमबूट घालावेत. जेणेकरून दूषित पाण्याचा संपर्क येणार नाही.
पायावर कोणतीही जखम असेल तर त्यावर तत्काळ उपचार करावेत. कारण दूषित पाणी जखमेद्वारे शरीरात जाऊ शकते.
सांडपाण्याचा संपर्क आलेल्या पाण्यातून चालू नये.
तुंबलेल्या पाण्यातून चालून घरी आल्यावर पूर्ण शरीर स्वच्छ धुऊन घ्यावे.
तापासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लेप्टोस्पायरोसिस होण्याची प्रमुख कारणे
लेप्टोस्पायरा बॅक्टेरिया प्रदूषित पाणी, चिखल, किंवा मातीत असतात. जर एखाद्याच्या त्वचेवर जखम, खरचटलेले असेल आणि तो भाग अशा पाण्याच्या संपर्कात आला तर त्याला संसर्ग होऊ शकतो.
संसर्ग झालेले प्राणी (विशेषतः उंदीर, कुत्रे, गायी, डुकरं) यांच्या मूत्रातून हे बॅक्टेरिया बाहेर पडतात. अशा मूत्राने प्रदूषित झालेल्या पाण्यातून किंवा थेट संपर्कातून संसर्ग होतो.
पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टो असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करू नये. पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे- डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग, जे. जे. रुग्णालय