विलेपार्ले हादरले! १३ व्या मजल्यावरील घराला भीषण आग; गुदमरून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:29 IST2026-02-09T16:18:19+5:302026-02-09T16:29:15+5:30
विलेपार्लेत उंच इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विलेपार्ले हादरले! १३ व्या मजल्यावरील घराला भीषण आग; गुदमरून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, एक जखमी
Vile Parle Fire:मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले (पूर्व) येथील सुविधा पर्ल या १३ मजली निवासी इमारतीला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या १३ व्या मजल्यावरील एका घराला लागलेल्या या आगीत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, एक ३४ वर्षीय महिला जखमी झाली आहे. धुराचे लोट संपूर्ण मजल्यावर पसरल्याने गुदमरून हा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
महपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, फिरोज शाह मेहता रोडवरील सुविधा पर्ल इमारतीच्या १३ व्या मजल्यावर सकाळी ९:५१ च्या सुमारास आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला मिळाला. इलेक्ट्रिक वायरिंगच्या डक्टमधून ही आग लागली आणि काही वेळातच तिने सदनिकेतील इतर खोल्यांना आपल्या विळख्यात घेतले.
बचाव कार्यात धुराचा अडथळा
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. मात्र, आग सर्वात वरच्या मजल्यावर असल्याने आणि संपूर्ण कॉरिडॉर व जिने दाट धुराने भरल्यामुळे जवानांना सदनिकेत प्रवेश करणे कठीण झाले होते. "आम्ही जेव्हा पीडितांना बाहेर काढले, तेव्हा त्या दोघीही बेशुद्ध होत्या," अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू
या घटनेत भावना सत्रा (६३) आणि अनेरी (३४) या दोघींना तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, भावना सत्रा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. धूर फुफ्फुसात गेल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. अनेरी यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अग्निशमन दलाची मोठी यंत्रणा तैनात
आगीची माहिती मिळताच प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कामाला लावली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ५ फायर इंजिन, २ जम्बो टँकर, २ एरियल वॉटर टॉवर टेंडर आणि हायड्रोलिक प्लॅटफॉर्म तैनात करण्यात आले होते. दुपारी १:४४ च्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.