दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 06:01 IST2025-03-03T05:59:18+5:302025-03-03T06:01:24+5:30
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडेंसंदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.

दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टाळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत पवार हे राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याशी बोलताना आणि मुंडे बाजूला उभे असलेले दिसतात. बोलणे संपल्यानंतर पवार चहा घेण्यासाठी निघातात तेव्हा मुंडे त्यांच्याकडे वळून बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र पवार मुंडे यांच्याकडे लक्ष न देताच तिथून निघून गेल्याचे व्हिडीओत दिसते. याबाबत पवार यांना विचारले असता, व्हिडीओ व्हायरल होतोय? असा उलट प्रश्न करत, आता ते माझ्याबरोबरच होते, असे सांगत मुंडेंना टाळल्याचा त्यांनी इन्कार केला.
मुंडे आणि कोकाटेंसदर्भात विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडेंसंदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. माणिकराव कोकाटेंसंदर्भात न्यायालयाचा निर्णय यायचा असल्याने कुठलीही भूमिका आज मांडता येत नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो बंधनकारक असणार आहे. कुठेही नैतिकतेचे अंधःपतन झाले आहे, असे वाटले तर आम्ही थेट त्यांचा राजीनामा घेऊ, असे सांगताना सुनील केदार प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती म्हणून ती कारवाई झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.