मेट्रोसाठी २२३८ झाडांचा बळी; शिवसेना, मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:19 IST2019-08-09T01:36:55+5:302019-08-09T06:19:17+5:30
वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर प्रस्ताव

मेट्रोसाठी २२३८ झाडांचा बळी; शिवसेना, मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई : आरे कॉलनीत प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या मार्गात २२३८ वृक्ष आहेत. हे वृक्ष कापणे तसेच ४६४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. याआधी पर्यावरणप्रेमींबरोबरच मनसे आणि शिवसेनेने या वृक्षतोडीला विरोध दर्शविला होता. त्यामुळे आता पुन्हा मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून आलेल्या या प्रस्तावावर सत्ताधारी कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मेट्रो रेल्वे-३ प्रकल्पांतर्गत मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी २२३८ झाडे कापणे, ४६४ झाडे पुनर्रोपित करणे व ९८९ झाडे तशीच ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २१ जुलै २०१७ रोजी वृक्ष प्राधिकरणाला प्रस्ताव सादर केला होता. वृक्षतोडीला विरोध दर्शवीत पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली. यामुळे ही झाडे कापण्याबाबत निर्णय घेण्यास प्राधिकरणाला मनाई करण्यात आली होती. नागरिकांकडून मागविलेल्या हरकती आणि सूचनांचा अहवाल वृक्ष प्राधिकरणाने न्यायालयात सादर केला. सप्टेंबर २०१८ मध्ये मेट्रो अधिकारी तर जुलै २०१९ मध्ये वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी वृक्षांची पाहणी केली. त्यानंतर वृक्ष कापण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीला आला आहे.
भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; सेनेचा विरोध
आरे कॉलनीत प्रस्तावित कारशेडच्या जागेत ३६६१ वृक्ष आहेत. २७०२ वृक्ष मेट्रो-३ कारशेडच्या बांधकामात बाधित होत आहेत. त्यातील २२३८ वृक्ष कापण्यात येणार आहेत.
हे वृक्ष कापण्यास मनसेने तीव्र विरोध केला होता. पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी जोरदार विरोध सुरू ठेवला होता. या आंदोलनात शिवसेनाही उतरली होती.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. भाजपचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने लोकसभा निवडणुकीत पुन्हा युती झाल्यानंतर आता शिवसेनेची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे वृक्ष प्राधिकरणाची बैठक गुरुवारी कोणतेही कामकाज न करता तहकूब करण्यात आली.
असा असेल आरे कारडेपो
३३ हेक्टर जागेपैकी २५ हेक्टरवर बांधकाम
सॅम (इंडिया) बिल्टवेलला कंत्राट
सप्टेंबरपासून कामाला सुरुवात
३० महिन्यांत काम पूर्ण करण्याचा मानस
कामाचा एकूण खर्च ३२८ कोटी
कारडेपोसह वर्कशॉप बिल्डिंग
मेट्रो स्थानक बिल्डिंग, सबवे
इन्स्पेक्शन्स, मेन्टेनन्स वर्कशॉप
ट्रेन धुण्यासाठीची व्यवस्थाही येथेच
ट्रेनिंग सेंटर, आॅपरेशन कंट्रोल सेंटर
सौरऊर्जा प्रकल्प, एलईडी लाइटसह पर्यावरणपूरक कारडेपो