Join us  

'उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचं पाप लागणार, रेशीमबागेजवळ कुजबूज'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 4:38 PM

कुख्यात गुन्हेगार विकास दुबे याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना पोलिसांचे एक वाहन उलटल्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला

ठळक मुद्दे कुख्यात गुन्हेगार विकास दुबे याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना पोलिसांचे एक वाहन उलटल्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केलाकाँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकारला टोला लगवला आहे

मुंबई - कानपूरच्या बिकरू गावात झालेल्या ८ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याचे शुक्रवारी सकाळी कानपूरजवळ पोलिसांनी एन्काऊंटर केले. मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये विकासला गुरुवारी पकडण्यात आले होते. तेथून त्याला कानपूर येथे आणले जाणार होते. परंतु कानपूरला पोहचण्याच्या आधीच घडलेल्या नाट्यमय थरारात विकास दुबे मारला गेला. विकास दुबे यांच्या चौकशीत अनेक पुरावे, धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांच्या आजच्या कारवाईनंतर ती शक्यता पूर्णपणे मावळल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरुन विरोधकांकडून उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर टीका केलीय.  

कुख्यात गुन्हेगार विकास दुबे याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना पोलिसांचे एक वाहन उलटल्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्याचे एन्काऊंटर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. बी. कमल यांनी पत्रकारांना सांगितले की, दुबेला हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हाच तो मृत होता. त्याच्या शरीरावर छातीवर तीन आणि हातावर एक घाव होता. वाहन उलटल्यानंतर या वाहनातील पोलीस निरीक्षक रमाकांत पचुरी आणि कॉन्स्टेबल पंकज सिंह, अनुप कुमार व प्रदीप हे जखमी झाले. याचवेळी दुबेने पचुरी यांचे पिस्तूल हिसकावले आणि पळाला. मात्र, चकमकीत जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, बिकरू येथे झालेल्या चकमकीप्रकरणी २१ जण आरोपी आहेत. यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सहा जण मारले गेले आहेत. अद्याप १२ जण वाँटेड आहेत. मात्र, याप्रकरणावरुन विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांची कारवाई चुकीची असून याची चौकशीची मागणी विरोधक करत आहेत. 

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारला टोला लगवला आहे. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे. विकास दुबेचा एन्काउन्टर खरा की खोटा, हे माहिती नाही. पण, उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचं पाप लागणार, अशी कुजबूज रेशीमाबागेजवळ चालू आहे म्हणे. असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अशा आशयाचे ट्विट केलंय. तसेच, उत्तर प्रदेश हे राज्य देशात सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे राज्य असल्याचेही राऊत यांनी म्हटलंय. त्यांनी, याबाबतच्या एका अहवालाचा दाखलाही दिला आहे.   

टॅग्स :विकास दुबेपोलिसनितीन राऊतभाजपानागपूर