महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार- राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 04:45 PM2020-01-15T16:45:30+5:302020-01-15T16:46:16+5:30

नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा यासाठी आता रुग्णालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Under the Mahatma Phule Jan Arogya Yojana, one thousand hospitals will be included - Rajesh Tope | महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार- राजेश टोपे

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार- राजेश टोपे

Next

मुंबई : सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून राज्यात आता प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. राज्यभरात सहभागी रुग्णालयांची संख्या दुप्पट करुन सुमारे एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना त्याचा फायदा होऊन दिलासा मिळेल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज व्यक्त केला.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर या संदर्भात अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा यासाठी आता रुग्णालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आगामी 15 दिवसांमध्ये त्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला जाईल.

सहभागी रुग्णालयांची संख्या दुप्पट

सध्या जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात 492 रुग्णालये सहभागी आहेत. 355 तालुक्यांपैकी 100 तालुके यामध्ये अंतर्भुत होत असून उर्वरित तालुक्यातील रुग्णांना योजनेमधून उपचार करुन घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा लगतच्या तालुक्यामध्ये जावे लागते. रुग्णांना प्रवास करावा लागू नये, त्यांना त्यांच्याच तालुक्यामध्ये उपचाराची सोय मिळावी यासाठी आता प्रत्येक तालुक्यामध्ये योजनेंतर्गत एका रुग्णालयाचा समावेश व्हावा यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेंतर्गत एक हजार रुग्णालयांचा सहभाग करण्यात येणार आहे.योजनेसाठी असलेल्या निकषानुसार रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे. विशेषत: दुर्गम, अतिदुर्गम भागातील तालुक्यांमध्ये रुग्णालयांचा समावेश करताना आवश्यकता भासल्यास काही प्रमाणात निकष शिथिल केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यामध्ये मोहोल्ला क्लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरु करण्यात येत आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल असे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास त्यासाठी खासगी डॉक्टरांची देखील मदत घेतली जाणार आहे.मोहोल्ला क्लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील. या योजनेचा समग्र अभ्यास करुन राज्यात त्या धर्तीवर योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Under the Mahatma Phule Jan Arogya Yojana, one thousand hospitals will be included - Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.