Udhav Thackeray opposed metro Car shed in 'aarey' | 'आरे'वरून उद्धव ठाकरेंचेही कारे; म्हणाले, नाणारचे झाले तेच आरेचे होणार! 
'आरे'वरून उद्धव ठाकरेंचेही कारे; म्हणाले, नाणारचे झाले तेच आरेचे होणार! 

मुंबई - एकीकडे विधानसभेसाठी भाजपा आणि शिवसेनेतील युतीबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच आता आरे येथील मेट्रो कारशेवडवरून हे दोन्ही पक्ष आमने-सामने येताना दिसत आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध केला असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुखांनीही या कारशेडविरोधात सूर आळवला असून, नाणारचे जे झाले तेच आरेचे होणार असे म्हटले आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरे येथील मेट्रो कारशेडला विरोध केला. ''काही काळापूर्वी नाणार प्रकल्पाबाबात असाच आग्रह धरण्यात आला होता. मात्र त्याचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. आता जे नाणारचे झाले तेच आरेचे होणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

 दरम्यान, राम मंदिराच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली. राम मंदिराबाबत केंद्र सरकारने काश्मीरसारखाच धाडसी निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिर हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि विषय आहे. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 उद्धव ठाकरेंनी उदयनराजेंबद्दलच्या अग्रलेखावरही स्पष्टीकरण दिले. ''सामना मध्ये लिहलेला अग्रलेख हा शुद्ध मराठीत लिहिलेला आहे. त्यामध्ये कुठेही उदयनराजेंचा अपमान करण्यात आलेला नाही. उदयनराजे हे आपला माणूस आहे. त्यामुळे आपल्या माणसाकडून काही अपेक्षा ठेवण्यात गैर काय?'' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचं समर्थन केलं, त्यावर प्रतिक्रिया दिली.  

साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला होता. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावरुन टीका केली होती. आता, उदयनराजेंना शिस्त लागली आहे, भाजपात कॉलर उडवणे जमत नाही, असे शिवसेनेने म्हटले होते. 
 


Web Title: Udhav Thackeray opposed metro Car shed in 'aarey'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.