बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धवसेनेचे 'पुनःश्च हरी ओम' अभियान; १७ कलमी कार्यक्रम निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 06:10 IST2026-04-02T06:10:34+5:302026-04-02T06:10:34+5:30
राज्यातील सर्व जिल्ह्यांत स्थानिक प्रश्नांवर प्रबोधन/संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहेत

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धवसेनेचे 'पुनःश्च हरी ओम' अभियान; १७ कलमी कार्यक्रम निश्चित
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उद्धवसेना 'पुनःश्च हरी ओम' अभियानांतर्गत बाळासाहेबांना अभिप्रेत संघटना उभारणीचा कार्यक्रम हाती घेणार आहे. यासाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसह, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, महिला आघाडी, युवासेना यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय १७ कलमी कार्यक्रम निश्चित केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी संघटनात्मक स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत स्थानिक प्रश्नांवर प्रबोधन/संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहेत.
यात्रांदरम्यान शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची भेट, त्यांच्याशी चर्चा, पक्षाला मिळालेल्या यश-अपयशाची कारणमीमांसा तसेच संघटनात्मक सर्वेक्षण करून काही ठिकाणी बदल, तर नव्यांना संधी देऊन पक्ष बांधणीवर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोणते उपक्रम राबविणार?
'विचारवंतांच्या मनातील बाळासाहेब' ही व्याख्यानमाला, त्यांनी काढलेल्या व्यंगचित्र, लेखांचे प्रदर्शन भरविणे, त्यांच्या भाषणांच्या चित्रफिती एलईडी व्हॅनद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविणे, जिल्हास्तरीय ज्येष्ठ शिवसैनिकांचे मेळावे, महिला आघाडीचे पुनरुज्जीवन, गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक' या अभियानाद्वारे शिवसैनिक नोंदणी, जिल्हा व विभागनिहाय पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणे, भजन, कीर्तन व लोककला महोत्सवांचे आयोजन, रक्तदान व वैद्यकीय शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा महोत्सव आयोजित करणे, असा हा १७ कलमी कार्यक्रम आखण्यात येणार आहे. त्याद्वारे संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.