Thackeray Group News: एकीकडे उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच अन्य ठिकाणच्या पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही ठाकरे गट तयारीला लागला आहे. उद्धव ठाकरे १६ एप्रिलला नाशिक येथे जाणार असून, कोकणातही दौरा करणार आहेत. असे असले तरी दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीत. यातच ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत असून, शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. आणखीही काही नेते संपर्कात असून, महिन्याभरात त्यांचा प्रवेश होईल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. कोकणातूनही अनेक नेते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात सामील झाले. अशातच कोकणात उद्धवसेनेला एक दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः बेटकर यांच्या हाती शिवबंधन बांधले.
मुख्य प्रवक्तेपदी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची निवड
प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी या शिवसैनिकांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. मुख्य प्रवक्तेपदी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतर आठ जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, संजना घाडी, जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान, आनंद दुबे, जयश्री शेळके यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, काही लोक शिवसेनेतून गेले मोठे झाले. पण त्यांना मोठी करणारी माणसे माझ्यासोबत आहे. शब्दाला जपणारी एकच शिवसेना आहे. थापा मारणारे हात वर करून मोकळे झाले आहेत. आता पुन्हा कोकणात पक्ष मजबूत करणार आहे. तळ कोकणापासून संपूर्ण कोकण दौरा करणार आहे. पूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार आहे. कोकणात एक पाऊल टाका असे मला सांगण्यात आले. पण मी सांगतो एकच पाऊल टाकणार नाही, पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करेन. कोण मधे येतो बघू. अख्खा महाराष्ट्र, माझे शिवसैनिक, शेतकरी बांधव सगेळ सांगत आहेत की, आम्ही फसवलो गेलो. आत्ता लोकांना खरी आपल्या शिवसेनेची गरज आहे. येत्या १६ एप्रिलला नाशिकला शिबीर घेण्यासाठी जातो आहे. सुट्ट्या संपल्या की माझा सलग दौरा मी तळ कोकणापर्यंत करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.