राज्य सरकारविरोधात उद्धवसेनेचे उद्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 08:25 IST2025-08-10T08:25:39+5:302025-08-10T08:25:39+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईतील सर्व विभागात आंदोलन करण्यात येणार

राज्य सरकारविरोधात उद्धवसेनेचे उद्या आंदोलन
मुंबई : महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. राज्यातील जनतेला या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी राज्यभरात सोमवारी ११ ऑगस्टला दुपारी १२ वाजता आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईतील सर्व विभागात हे आंदोलन करण्यात येणार असून मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत, अशी माहिती उद्धवसेनेच्या पक्ष कार्यालयातून देण्यात आली आहे.
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा ६० कोटींचा घोटाळा व १५०० कोटींचा गैरव्यवहार, कृषिमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचे रमीचे डाव आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा विचारलेला प्रश्न, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेला डान्सबार, सरकारमधील मंत्री व अधिकाऱ्यांचे हनीट्रॅप प्रकरण तसेच भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येऊनही मंत्र्यांचे राजीनामा न घेणारे सरकार याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. शिवाजी पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ होणाऱ्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत, असेही या पत्रकात म्हटले आहे.