ऐन निवडणुकीत उद्धवसेनेला धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचा राजीनामा; भाजपात प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 16:57 IST2026-01-04T16:57:14+5:302026-01-04T16:57:47+5:30
या राजीनाम्यानंतर शुभा राऊळ यांनी भाजपाचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार आणि नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली.

ऐन निवडणुकीत उद्धवसेनेला धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचा राजीनामा; भाजपात प्रवेश करणार
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शुभा राऊळ यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राजीनामा दिला आहे.
या राजीनामा पत्रात शुभा राऊळ म्हणतात की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि आपल्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून शिवसेनेत कार्यरत राहिले आहे. मात्र काही कारणास्तव मला शिवसेना अंतर्गत शिवआरोग्य सेनेच्या अध्यक्ष या पदाचा तसेच शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आपणाकडून मिळालेल्या आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल मी आभार व्यक्त करते असं सांगत त्यांनी उद्धवसेनेला रामराम ठोकला आहे.
या राजीनाम्यानंतर शुभा राऊळ यांनी भाजपाचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार आणि नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आलेत. त्यामुळे शेलारांच्या उपस्थितीत शुभा राऊळ या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शुभा राऊळ या दहिसर येथील उद्धवसेनेच्या महिला नेत्या होत्या. त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले आहे. अलीकडेच दहिसर येथील उद्धवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्या सून माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यानतर दहिसरमध्ये शुभा राऊळ यांच्या भाजपा प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, याआधीही शुभा राऊळ यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. विनोद घोसाळकर यांच्या कार्यपद्धतीवर शुभा राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी शुभा राऊळ यांनी पक्षाचा राजीनामा देत मनसेत प्रवेश केला होता. त्यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना यश आले नाही. मात्र निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात शुभा राऊळ स्वगृही परतल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुन्हा पक्षात स्वागत केले होते. परंतु आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शुभा राऊळ यांनी पुन्हा पक्षाची साथ सोडली आहे.