Join us

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:01 IST

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी काळात एकत्रित निवडणूक लढणार अशी चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू युती होणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यातच गणपती दर्शनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले होते. मात्र आज पुन्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. या भेटीवेळी मनसेचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सततच्या भेटीमुळे युतीबाबत कार्यकर्त्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

शिवसेना-मनसे युतीची चर्चा

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकमेकांच्या जवळ आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी काळात एकत्रित निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली. हिंदी जीआर मागे घेतल्यानंतर मराठी विजयी मेळावा या दोन्ही पक्षाकडून आयोजित करण्यात आला. यावेळी २० वर्षांनी पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमधील आपुलकी दिसून आली. त्यानंतर युतीची चर्चा जोर धरू लागत असतानाच राज ठाकरे यांनी युतीबाबत कुणीही भाष्य करू नये असा आदेश मनसे नेत्यांना दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर भेट देत मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे युतीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला. 

राज ठाकरे यांच्या मातोश्री दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थला कधी जाणार अशी उत्सुकता होती. त्यातच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले. तिथे ठाकरे कुटुंबीय एकत्रित आले. जवळपास अडीच तास उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी होते. त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेले आहेत. यावेळी ठाकरेंसोबत संजय राऊत, अनिल परब हे नेतेही उपस्थित आहेत. तर राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर हे हजर आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंची या भेटीगाठी आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय सूतोवाच देतायेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.

दसरा मेळाव्याला राज ठाकरे व्यासपीठावर दिसणार?

अलीकडेच उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्रित दिसतील, येणारा दसरा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ असेल असे संकेत राज ठाकरेंबाबत दिले होते. त्यात आमची विचारसरणी एक असली तरी उद्धवसेनेच्या दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतात आणि गुढीपाडव्याला राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. पण तरी प्रमुख पाहुणे म्हणून राज दसरा मेळाव्याला येऊ शकतात का? असे पत्रकारांनी विचारले असता हे मी कसे काय सांगणार? मी किंवा अन्य कोणी याविषयी मत व्यक्त करणे बरोबर नाही, ते उद्धव ठाकरे ठरवतील असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते. 

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेभाजपामनसेसंजय राऊत