“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 15:34 IST2025-09-27T15:29:48+5:302025-09-27T15:34:56+5:30
Uddhav Thackeray PC News: पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर केले असून, तशी मदत महाराष्ट्र सरकारने द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray PC News: महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का? बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७५ लाख महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये टाकले. बिहारला मदत करताय म्हणून पोटदुखी नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून मतदान केले, आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, परिस्थितीवर चर्चा केली. दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला. समोर दिसतय तर प्रस्ताव कसला पाठवायचा? असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या दोन-तीन वर्षातील हजारो कोटींची जाहीर केलेली मदत अजूनही पोहोचली नाही. २०१७ च्या कर्जमाफीची अजूनही प्रतिक्षा आहे. त्यानंतर आमचे सरकार आले, मी कर्जमुक्ती केली. इतरही वेळेला संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून नाही बसलो. मला यात राजकारण आणायचे नाही, पण जर केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, त्यांना मदत करा, यामध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी ते जरूर राजकारण समजावे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी
सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त केले पाहिजे. त्याचबरोबर ज्या प्रमाणे पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये, कालबद्ध कार्यक्रम करून जाहीर केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी. मी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ जाहीर करून कालबद्ध पद्धतीने त्याचे वाटप करा. बँकाच्या शेतकऱ्यांना जात असलेल्या नोटीसा थांबवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, शेत जमीन पुन्हा पीक घेण्यायोग्य बनवण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागतील. आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आहे. आता जमीन साफ करायचाच एकरी खर्च ५ लाख आहे. शेत जमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार. मराठवाड्यात आकाश फाटले आहे. अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. पीक उद्ध्वस्त झाले. शेतात पाणी होते. शेतकरी आपुलकीने माझ्याशी बोलले. सरकारने आता जी मदत देऊ केली आहे. ती अगदीच तुटपूंजी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. खूप मोठे नुकसान झाले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.