“राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचे भाजपाने मान्य केले, जाहीर अभिनंदन करतो”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:44 IST2025-11-03T14:44:19+5:302025-11-03T14:44:53+5:30
Uddhav Thackeray PC News: मतदार यादीत सुधारणा करा तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

“राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचे भाजपाने मान्य केले, जाहीर अभिनंदन करतो”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray PC News: मतदारयादीतील घोळावरून मनसे, महाविकास आघाडीसह विरोधकांनी ‘सत्याचा मोर्चा’ काढला. राज ठाकरे यांचे लोकलने मोर्चाला पोहोचणे, मोर्चाआधी उद्धव ठाकरेंशी त्यांनी केलेली चर्चा, मोर्चातील सहभागाविषयीची शंका दूर करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेला सहभाग आणि विविध विरोधी पक्षांच्या कार्यकर्ते, समर्थकांचा मोठा उत्साही सहभाग यामुळे मोर्चा लक्षणीय ठरला. या मोर्चात राज ठाकरे यांनी काही पुरावे दाखवले. याला उत्तर म्हणून भाजपाने काही गोष्टी मीडियासमोर आणल्या. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर खोचक टीका केली.
मतचोरीबाबत परवा जो मोर्चा झाला तो प्रचंड मोठा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिल्यांदाच सर्व पक्ष एकत्र येत त्यांनी निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. मतदार यादीत सुधारणा करा तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी मागणी करतानाच उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना संबोधित केले.
राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचे मान्य केले, जाहीर अभिनंदन करतो
आशिष शेलार यांनी आम्हाला फुलटॉस चेंडू टाकला आहे. मुळात त्यांनी आमचा आरोप मान्य केला आहे. मतदारयाद्यांमधील घोळ त्यांनी मान्य केले आहेत. मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातील मतदार याद्या सदोष असल्याचे मान्य केले. मुख्यमंत्री बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करून घसा कोरडा करून आलेले असतानाच शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना हे आरोपांचे अमृत पाजले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, आशिष शेलारांवर मी कधी बोलत नाही. मतदार यादीत गोंधळ आहे हे आशिष शेलारांनी सिद्ध केले. आम्ही पूर्ण मतदार यादीत सुधारणा करा अशी मागणी करत आहोत. सहसा त्यांच्या नेत्याविरोधात बोलण्याचे धाडस सहसा भाजपावाले करत नाही. परंतु शेलारांनी थेट मोदी-शाहांपासून सगळ्यांवर केला आहे. कारण दुबार मतदारांचा हा आरोप त्यांनी लोकसभेपासून काढलेला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.