EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 20:26 IST2026-01-15T19:48:42+5:302026-01-15T20:26:58+5:30
मुंबई महापालिकेच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिल्याचे चित्र समोर आले आहे.

EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
मुंबई - राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. या मतदानानंतर विविध संस्थांनी तयार केलेले एक्झिट पोल सर्वच माध्यमांवर झळकले. त्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये ठाकरे बंधू यांना मोठा धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईतल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने कौल मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र यातच उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून खळबळजनक दावा केला आहे.
या ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलंय की, आताची ताजी खबर, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भाजपासोबत प्रदीर्घ चर्चा आणि बैठक संपली. देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील खास खजिनदार, लाडका बिल्डर आणि गगराणी यांच्या बैठकीत काय शिजले? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. संजय राऊतांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहे. राऊतांच्या या ट्विटचा रोख मोहित कंबोज यांच्या दिशेने असल्याचं बोलले जाते. फडणवीस आणि मोहित कंबोज यांच्यातील संबंध सगळ्यांनाच माहिती आहेत. त्यात मोहित कंबोज यांनी दुपारी १२.३० च्या सुमारास एक ट्विट केले होते. त्यात भाजपा मुंबईत १०० हून अधिक जागा जिंकेल असा दावा केला आहे.
आताची ताजी खबर:
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 15, 2026
मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी
यांची व कमळाबाईची प्रदीर्घ चर्चा आणि बैठक संपली
देवेंद्र फडणवीस यांचा मुम्बईतील खास खजिनदार ,लाडका बिल्डर
आणि गगराणी यांच्या बैठकीत काय शिजले?
Bjp Mumbai Crossing 100+ @BJP4Mumbai@AmeetSatam
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) January 15, 2026
एक्झिट पोलमध्ये काय आहेत अंदाज?
मुंबईत DV रिसर्च या सर्व्हेनुसार सत्ता परिवर्तनाचे संकेत आहेत. त्यात भाजपा आणि शिंदेसेनेला १०७ ते १२२ जागा मिळू शकतात तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ६८ ते ८७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय काँग्रेस वंचित आघाडीला १८ ते २५ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २-४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच इतरांच्या खात्यात ८ ते १५ जागा जातील असा अंदाज आहे. या इतरांमध्ये अपक्ष, समाजवादी पक्ष, एमआयएम यांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत त्यात बहुमताचा आकडा पार करण्यासाठी ११४ जागांची गरज आहे.
दरम्यान, सकाळच्या एक्झिट पोलमध्येही महायुतीच्या बाजूने जनमत असल्याचं दिसले. त्यात महायुतीला १२२ जागा मिळतील असं बोलले जाते. भाजपा ८४, शिंदेसेना ३५, उद्धव ठाकरे ६५ आणि मनसेला १० जागा मिळतील असा अंदाज आहे. या पोलमध्ये काँग्रेस वंचित आघाडीला २० जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपाला ४० टक्के पुरुष, ४४ टक्के महिला यांनी पसंती दाखवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ३३ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिलांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. काँग्रेसला १३ टक्के महिला आणि पुरुष मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.