ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरे म्हणाले, "कधीतरी तुमचं डोकं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 20:51 IST2025-02-07T20:49:23+5:302025-02-07T20:51:13+5:30

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray has reacted to the talk that six MPs from the Thackeray group are going to split | ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरे म्हणाले, "कधीतरी तुमचं डोकं..."

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरे म्हणाले, "कधीतरी तुमचं डोकं..."

Uddhav Thackeray: विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा शिवबंधन कार्यअहवाल प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अशातच ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटणार असल्याचा दावा केला जातोय. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाकुंभातील स्नानावरूनही टोला लगावला आहे.  

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान केलं असं म्हणतात. एकेकाळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते तेव्हा हे बोलत होते की पंतप्रधान रेनकोट घालून आंघोळ करतात. ते भाविक असतील त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला मी तडाखा मारत नाही. पण गंगेत डुबकी मारताना आपला रुपया सुद्धा डुबतो आहे याच्याकडे सुद्धा त्यांचे लक्ष असलं तर बरं. आता दिल्लीच्या तख्तावर जे बसले आहेत त्यांना माहिती नाही की त्यांचे तक्त महाराष्ट्र राखतो. महाराष्ट्रावर जुलूम केला तर दिल्लीचेही तक्त फोडतो महाराष्ट्र माझा ही नवीन ओळ आपल्याला लिहावी लागेल. सगळेच काय तुमचे गुलाम होऊ शकत नाहीत आणि होणारही नाहीत गुलामी महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"जे वाट चुकले आहेत त्यांना असं वाटतंय की आपल्याला मोक्ष मिळेल असं अजिबात नाही. महाराष्ट्रावर अन्याय करून कोणाला मोक्ष मिळणार नाही. तुमचा काय सोक्षमोक्ष लावायचा आहे तो आम्ही इथेच लावू. आपल्याला पराभव पचलेला नाही तसा त्यांना विजय सुद्धा पचलेला नाही. कारण एवढं बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री कोण हे ठरवायला एक महिना लागला. काही ठिकाणी पालकमंत्री पद अजून ठरत नाहीय. या सगळ्या खेचाखेचीला तुम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणता," असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

"आज सकाळी बातमी सोडून दिली होती की शिवसेनेचे सहा खासदार फुटणार. हिम्मत असेल तर फोडून दाखवा. पण आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत बघू नका. कारण फोडाफोडी करायला लागला तर कधीतरी तुमचं डोकं फुटेल. फोडाफोडी करायची असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा पोलीस यंत्रणा बाजूला ठेवा," असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

Web Title: Uddhav Thackeray has reacted to the talk that six MPs from the Thackeray group are going to split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.