Uddhav Thackeray demanded action against crop insurance scheme | पीकविमा योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी 
पीकविमा योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी 

मुंबई - शेतकऱ्यांसाठीच्या पिकविमा योजनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेमध्ये घोटाळा होत असून, अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच या योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. 

या योजनेच्या प्रामाणिकतेबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेत 53 लाख शेतकरी पात्र तर 90 लाख शेतकरी  अपात्र ठरवले गेले. यापैकी 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी मदत शिवसेनेमुळे झाली. मात्र शेतकऱ्यांना देणे असलेले 2000 कोटी रुपये कंपन्यांकडे अजून पडून आहेत. पिकविमा योजनेमध्ये दोन टक्के रक्कम शेतकरी भरतात, तर उर्वरित 98 टक्के रक्कम सरकारकडून दिली जाते. मात्र विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. या योजनेतील संपूर्ण लाभ शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. सरकारने कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा. हा पैसा सरसकट मिळावा नाहीतर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या यंत्रणेतून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा. ही योजना म्हणजे विमा कंपनी बचाव योजना नाही. '' असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. 

पीकविमा योजना हा घोटाळा आहे. या योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच 90 लाख शेतकऱ्यांना कोणी अपात्र ठरवलं. त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज आहे, असे सांगत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ मिळवून देणार असेही सांगितले. 


Web Title: Uddhav Thackeray demanded action against crop insurance scheme
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.