Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 13:45 IST

शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते वाशिम, ठाणे आणि मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी वाशिममध्ये सुमारे २३,००० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाची झलक देण्यासाठी पंतप्रधान तेथे पंतप्रधान बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी एकूण ५६,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. दीड महिन्यांनी सत्तेत बसलेले बेरोजगार होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुंबईत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात त्यांच्या कंत्राटदार मित्राचे खिसे भरण्यासाठी येतात. अनेक प्रकल्पांची घोषणा होते पण प्रकल्प कुठे जातात हे माहिती नाही, केवळ मोठ-मोठ्या घोषणा होतात, पण प्रकल्पाचे लोकार्पण हो नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

"बाळासाहेबांची शिकवण आहे की नोकऱ्या घेणारे होऊ नका देणारेही व्हा. शिवसेनेने रोजगारासाठी काय केलं मोजायचं झालं तर आपलं कर्तृत्व फार मोठं आहे. निवडणुका जिंकण्यासाठी दंगली भडकवण्याचे राजकारण चाललं आहे. दंगल कोणीतरी भडकवून देतं आणि त्यात सामान्य माणसं मारली जातात. दंगलीचे भांडवल करुन सत्ताधारी सत्ता मिळवतात. या सगळ्यात रोजगारासाठी शिवसेना काम करतेय तसे या लोकांनी येऊन सांगावे. पंतप्रधान आज ठाणे आणि मुंबईची वारी करत आहेत. चांगला योगायोग आहे. पंतप्रधान त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला येत आहेत. हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन होऊन ते पूर्णही होत नाहीत.  कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जातात. पण सामान्य माणसांच्या घरातील चूल पेटत नाही. पण यातील फरक हाच आहे की आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आणि त्यांचे घर पेटवणारं आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

"प्रत्येक राज्यात भूमिपुत्राचा मान राखलाच गेला पाहिजे. नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसत्या योजनांच्या घोषणा केल्या जात आहे. योजनांच्या घोषणांनी लोकांची पोटं भरत नाहीत. त्या योजना अमलात आल्या पाहिजेत. आमचं सरकार पाडल्यानंतर एकतरी मोठी प्रकल्प सुरु झाला आहे का? पण गद्दारीनंतर जी अस्थिरता माजली त्यामुळे कोणीही गुंतवणूकदार आपल्या राज्यात यायला तयार नाही हे वास्तव आहे. पण आता महिना दीड महिना राहिलेला आहे. मोदीजी तुम्हाला जेवढ्या फित्या कापायच्या आहेत तेवढ्या कापा. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दीड महिन्यांनी सत्तेत बसलेले बेरोजगार होणार आहेत. आमच्याकडे आल्यावर एकाही गद्दाराला नोकरी देणार नाही," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीमहाराष्ट्र