“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:43 IST2025-10-17T15:41:14+5:302025-10-17T15:43:16+5:30
Shiv Sena Uddhav Thackeray Group News: या सरकारला आपल्याला घालवायचे आहे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
Shiv Sena Uddhav Thackeray Group News: मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत शिवसेना आहे. त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आठ दिवसांपूर्वी मराठवाड्यात आलो होतो. मराठवाड्यातील जनतेला शब्द दिला आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत या सरकारला सोडायचे नाही. तुमच्या सर्वांच्या साक्षीने सर्वांना सांगितले होते. सरकारची फसवाफसवी सुरू आहे. कर्ज पूर्ण माफ करावे ही आपली मागणी आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या सरकारला आपल्याला घालवायचे आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क आहे. दिवाळीनंतर मराठवाड्यात दौरा करणार आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्राने या सरकारचा अनुभव घेतला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मला मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकरी आठवतो आहे. त्या शेतकऱ्यांच्या मागे इतर कोणी येवो न येवो, त्यांच्यासोबत कोणी राहो न राहो पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावर न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी यापूर्वीही दिलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने १ लाख जमा करा
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने १ लाख रुपये जमा करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. मी दिवाळीनंतर येणार असलो, तरी तालुका पातळीवर सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही हे पाहायला हवे. तसेच ती मदत मिळवून देण्याचे काम आपल्या शिवसैनिकांनी करायचे आहे. नुसत्या घोषणा देऊन काही उपयोग नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने जे साडेतीन लाख जाहीर केले आहेत, त्यातील पैसे शेतकऱ्यांना नंतर द्यावे, पण यातील एक लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावे.