Join us  

सत्ताधारी पक्ष विजयप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गुजरातच्या निमित्ताने दिसले, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 8:21 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपाला टार्गेट केले आहे. 

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपाला टार्गेट केले आहे. सत्ताधारी पक्ष विजयप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गुजरातच्या निमित्ताने दिसले. त्यांचे ‘मिशन १५०’ संपूर्णपणे फ्लॉप झाले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. तसंच  ''ईव्हीएम मशीनवर पंतप्रधानांच्या राज्यातच प्रश्न उभे केले गेले आहेत व हार्दिक पटेलसारख्या तरुण नेत्याने ईव्हीएमची चालबाजी सोदाहरण समोर आणली आहे.  ईव्हीएममधील आकडे कसे काय बदलू शकतात, हा प्रश्नच आहे व हार्दिक पटेलने हाच प्रश्न विचारून निवडणुकांतून ईव्हीएम मशीन बाद करावी अशी मागणी केली आहे.  हार्दिकचे म्हणणे खरे मानले तर भाजपने सध्या जो विजयी ढोल बजाव उपक्रम सुरू केला आहे त्यात मोदी यांच्या बरोबरीने ईव्हीएम मशीनवरही फुलमाळा चढवून फटाके फोडायला हरकत नाही, म्हणजे विजयाचा ‘वास्तव’ आनंद मिळवता येईल'', अशी खोचक टीकादेखील उद्धव यांनी केली आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?देशाचे राजकीय चित्र अधिकाधिक स्पष्ट होत आहे की अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे बनत आहे? गुजरात-हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर हा प्रश्न उफाळून आला आहे. निवडणुका म्हटल्या की जय-विजय व्हायचेच, पण सत्ताधारी पक्ष विजयप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गुजरातच्या निमित्ताने दिसले. त्यांचे ‘मिशन १५०’ संपूर्णपणे फ्लॉप झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर भाजपला १५१ जागा मिळतील आणि विरोधकांनी प्रचारात चिखलफेक केल्याने हे ‘लक्ष्य’ सहजसाध्य होईल असे सांगितले होते. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘१५० प्लस’ हाच भाजपचा ‘खरा विजय’ असेल, ९० ते १४९ यादरम्यान भाजपला जागा मिळाल्या तर विजयोत्सव करू नका असे सांगत होते. मात्र ‘१५० प्लस’ सोडा, उलट गुजरातच्या जनतेने भाजपच्या पारड्यात ‘१०० मायनस’चे दान टाकले. अर्थात निवडणूक प्रचारात पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अशी भाषणे केली जातात हेदेखील खरेच. त्यात अनपेक्षित काही नाही. फक्त निकाल अपेक्षेनुसार लागलेला नसतानाही मग विजयोत्सव का साजरा केला जात आहे, एवढाच प्रश्न आहे. एक मात्र खरे की, भाजपला आता गुजरातच्या जनतेलाही गृहीत धरता येणार नाही. शहरी भागात भाजपास विजय मिळाला, तर ग्रामीण गुजरातने भाजपचा पैसा व दबाव धुडकावून लावला. पंतप्रधानांच्या अश्रूंनीही शेतकऱ्यांचे मन द्रवले नाही. कारण गुजरातचा शेतकरीही गेल्या २२ वर्षांपासून जगण्या-मरण्याचा संघर्ष करीत आहे. त्यांचे मुडदे पडले तरी ‘तिरडी’समोर उभे राहून आश्वासनांचा धुरळा उडवला गेला. 

शहरातील वर्ग भाजपकडे झुकला आहे, पण खरा हिंदुस्थान खेड्यात आहे व या गावातील शेतकरी-कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. ग्रामीण गुजरातमध्ये भाजपला सातत्याने ८० टक्के मते मिळत आली आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपास ग्रामीण गुजरातने झिडकारले व ३०-३५ टक्के मतांची घसरण झाली. सरकारने १ कोटी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य जाहीर केले होते. पण गेल्या ३ वर्षांत जेमतेम एक लाख नवा रोजगार निर्माण झाला आहे. पुन्हा गुजरात, महाराष्ट्रासारख्या राज्यात अनेक गावांचे, जिल्ह्यांचे शहरीकरण झाले आहे. त्यामुळे या राज्यांत भाजप थोडीफार मतांची अपेक्षा ठेवू शकतो. मात्र पुढील वर्षभरात ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत त्या कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेशमध्ये आजही मोठा प्रदेश ‘ग्रामीण’च आहे. ग्रामीण गुजरातमध्ये जशी भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई झाली तशीच जोरदार टक्कर या राज्यांच्या ग्रामीण भागातही होऊ शकते. गुजरातच्या निवडणूक प्रचारावरच देशाचा पूर्ण फोकस राहिल्याने हिमाचल प्रदेशातील निकालांकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाले. हे ‘पहाडी’ राज्य आहे. ६८ आमदारांची ही विधानसभा. येथे साधारण ३५ चे बहुमत लागते. भाजपने तेथे ४४ जागा जिंकल्या, पण तरीही त्यांचा विजय काळवंडलाच आहे. कारण भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. भाजपचे राज्यप्रमुख पराभूत झाले. अनेक नेते गडगडले. हिमाचल प्रदेशमध्येही भाजप शहरी भागात पुढे गेली, पण काँग्रेसला २१ जागा मिळाल्या त्या प्रामुख्याने ग्रामीण भागात. गुजरातेत तर पंतप्रधान मोदींच्या जन्मगावात भाजप पराभूत झाला. याचा अर्थ विकासाची हवा ग्रामीण हिंदुस्थानात पोहोचलेली नाही व भाजप सरकार फक्त हवेत तीर मारून ‘हवाबाण’ हरडेचे उत्पादन करीत आहे. गोंधळाचे व चिंतेचे कारण असेही आहे की, भाजपला जो विजय मिळाला त्यावरही लोकांचा विश्वास नाही व हा विजय गोलमाल किंवा हेराफेरीतून मिळाला आहे काय, अशा शंकांनाही जागा मिळत आहे. ईव्हीएम मशीनवर पंतप्रधानांच्या राज्यातच प्रश्न उभे केले गेले आहेत व हार्दिक पटेलसारख्या तरुण नेत्याने ईव्हीएमची चालबाजी सोदाहरण समोर आणली आहे. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपचे चेहरे काळवंडले होते व त्यांचे पाद्रे पावटेच झाले होते. एक वेळ अशी होती की काँग्रेसने बहुमताची आघाडी घेतलीच होती, पण शेवटच्या टप्प्यात जेथे फेरमतमोजणी झाली तेथे म्हणे ईव्हीएमवरील आधीचे आकडे बदलले.

ईव्हीएममधील आकडे कसे काय बदलू शकतात, हा प्रश्नच आहे व हार्दिक पटेलने हाच प्रश्न विचारून निवडणुकांतून ईव्हीएम मशीन बाद करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे चिंता व गोंधळ यांचे मिश्रण लोकांत आहे. हार्दिकचे म्हणणे खरे मानले तर भाजपने सध्या जो विजयी ढोल बजाव उपक्रम सुरू केला आहे त्यात मोदी यांच्या बरोबरीने ईव्हीएम मशीनवरही फुलमाळा चढवून फटाके फोडायला हरकत नाही, म्हणजे विजयाचा ‘वास्तव’ आनंद मिळवता येईल. हिमाचलचे ठीकच आहे, पण गुजरातेत शंभरचा आकडाही गाठता आला नाही याचे ढोल कोणी मुंबईत वाजवीत असतील तर त्यांना गुजरात विजयाचा खरा अर्थ समजलेला नाही असेच दिसते. ही मानसिक अवस्था राजकीय गुंतागुंत करणारी आहे. त्यांची डोकी ठिकाणावर येवोत व आंतरराष्ट्रीय ढोलवादनात त्यांना पुरस्कार मिळो!

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबईगुजरात निवडणूक 2017नरेंद्र मोदीभाजपाशिवसेना