Uddhav Thackeray: सभेसाठी या रे... खैरेंनी लोकांना पैसे वाटल्याचा मनसेचा दावा, पुराव्यादाखल शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 09:59 IST2022-06-09T09:46:09+5:302022-06-09T09:59:34+5:30
सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे.

Uddhav Thackeray: सभेसाठी या रे... खैरेंनी लोकांना पैसे वाटल्याचा मनसेचा दावा, पुराव्यादाखल शेअर केला फोटो
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टिकेला उत्तर देताना, आमचं हिंदुत्व हे ह्रदयात राम आणि हाताला काम देणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, भाजपकडून सुपारी देऊन भोंगा वाजवला जात असल्याची टिकाही त्यांनी केली. राज ठाकरेंच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंनी औरंगाबादेतून हुंकार दिला. त्यामुळे, दोन्ही नेत्यांच्या सभेची तुलना होत आहे. मनसेकडून आता उद्धव ठाकरेंच्या सभेवर टिका होत आहे. त्यातच, या सभेसाठी पैसे देऊन माणसे आणल्याचा दावाही मनसेनं केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मनसेच्या नेत्यांनी टिका करायला सुरुवात केली आहे. सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे. तर, सभेच्या गर्दीवरुन मनचिसेच्या अमेय खोपकर यांनी निशाणा साधला आहे. 'हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त आणि फक्त राज ठाकरे. मुख्यमंत्री यांची सभा बघा, मागे सर्व खुर्च्या आणि उभा राहायला जागाचं जागा, सभा सुरू असताना लोक घराकडे रवाना, नाद करायचा पण मनसेचा नाही, जय हिंदुराष्ट्र ! असे म्हणत खोपकर यांनी सभेला गर्दी कमी होती, असे म्हटलं आहे.
चंदू खैरे सभेआधी पैसे वाटताना…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 8, 2022
चंदू खैरेंचा ‘आक्रोश’ - सभेसाठी या रे pic.twitter.com/TYYEQT4Shh
खोपकर यांनी चंद्रकांत खैरेंचा एक फोटोही ट्विटरवरुन शेअर केला आहे. या फोटोसोबत, सभेअगोदर चंद्रकांत खैरेंनी पैसे वाटल्याचा दावाही त्यांनी केलाय. चंदू खैरेचा आक्रोश - सभेसाठी या रे... असे कॅप्शन खोपकर यांनी खैरेंच्या फोटोसोबत दिले आहे. या फोटोत खैरेंच्या हातात पैसे दिसून येतात, तर आजूबाजुला अनेकजण असल्याचे दिसते. मात्र, हा फोटो नेमका केव्हाचा आहे याबाबत मनसेनं ठोसं काहीही सांगितलं नाही. तर, फोटो जुना असल्याची चर्चा होत आहे.
हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त आणि फक्त माननीय राज साहेब ठाकरे...!
मा.मुख्यमंत्री यांची सभा बघा मागे सर्व खुर्च्या आणि उभा राहायला जागाचं जागा,सभा सुरू असताना लोक घराकडे रवाना,नाद करायचा पण मनसेचा नाही.जय हिंदुराष्ट्र 🙏🏽 https://t.co/2xhLH5OtDDpic.twitter.com/aXQGIHAHIE— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 8, 2022
उद्धव ठाकरेंनी भाजपवर साधला निशाणा
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली. या सभेत त्यांनी हिंदुत्त्व, औरंगाबादचा पाणी प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे आज देशावर नामुष्कीची वेळ आली. बेताल वक्तव्य करणाऱ्या या प्रवक्त्यामुळे देश माफी मागणार नाही. कारण, भाजपचा प्रवक्ता हा देशाचा प्रवक्ता नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी, मनसेसह, राणा दाम्पत्यावरही त्यांनी नाव न घेता टिका केली. आता मनसेकडून या टिकेला आणि एकंदरीत सभेवर भाष्य करण्यात आलं आहे.