Uddhav Thackeray: अपघातातील मृत 9 जणांच्या कुटुंबीयांस 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:59 IST2022-05-21T15:57:39+5:302022-05-21T15:59:11+5:30
चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली

Uddhav Thackeray: अपघातातील मृत 9 जणांच्या कुटुंबीयांस 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुंबई - चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूरनजीक झालेल्या अपघाताची भीषणता अंगाचा थरकाप उडविणारी होती. अपघातानंतर रस्त्याच्या मध्यभागी ज्वालामुखी उफाळून येतो, असे आगीचे लोळ उठले होते. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. अपघाताची भीषणता एवढी तीव्र होती की, आगीत जळालेल्यांचे मृतदेह ओळखणेही कठीण बनले होते. अपघातानंतर स्थानिकांनी आणि प्रशासननाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग विझविण्यापलीकडे ते काहीही करू शकले नाहीत. आत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला.
चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच प्रत्येकी ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याची घोषणा केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2022
5 लाखांची मदत करा, मुनगंटीवारांनी केली होती मागणी
अजयपूरजवळ डिझेल टँकर व लाकूड भरलेल्या ट्रकच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ व्यक्तींना तातडीने प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून जाहीर करावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
महामार्गाव कायम वर्दळ, भीषण अपघाताने गाव सुन्न
चंद्रपूर-मूल मार्गाने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. दोन्ही बाजूने वाहने धावत होती. मूलकडून चंद्रपूरकडे लाकडाने भरलेला ट्रक येत होता. त्या ट्रकमध्ये चालकासह कॅबीनमध्ये सहा मजूर बसले होते. तर विरुद्ध दिशेने येणारा चंद्रपूरकडून मूलकडे डिझेल टँकर जात होता. या टँकरमध्ये चालकासह क्लिनरही होता. अचानक दोन्ही वाहनांची धडक होताच स्फोट झाला आणि परिसर हादरला. या घटनेचे काही जण साक्षीदार होते. धडक होताच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगडोंब उसळला.
आग विझली, परंतु, कोणीही जवळ जाऊ शकत नव्हते. अखेर सकाळ झाली. तेव्हा लाकडाच्या ट्रकमध्ये आणि डिझेल टँकरमध्ये नऊ जणांचे मृतदेह कोळसा झालेल्या लाकडासारखे पडलेले होते. हे दृश्य पाहून धक्काच बसला. या घटनेची वार्ता पसरताच बापरे हा एकच शब्द प्रत्येकाच्या तोंडून निघत होता. ओळख पटली तेव्हा यातील सहा जण बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावची तरुण मुले असल्याचे कळले. या गावावर शोककळा पसरली. या हृदय हेलावणाऱ्या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
काळ कधी आणि कुठे दबा धरून असेल, सांगता येत नाही. मग जर तरलाही थारा नसते. रात्री १०.३० वाजताची वेळ. काळ दबा धरून बसलेला. एका बाजूने लाकूड भरलेला ट्रक म्हणजे एकप्रकारची चिताच. त्यावर बसलेले मजूर म्हणजे जिवंत मृतदेहच, दुसरीकडे डिझेल टँकर म्हणजे चितेवर टाकण्यासाठी लागणारे तेल. असा काळयोगच होता तो... दोन्ही वाहनांची धडक होताच आगीचा भडका उडाला. आगीत तब्बल नऊ जण होरपळत होते; मात्र काळाने त्यांना आक्रोश करायला संधी दिली नाही.