वक्फ कायद्यावरून मविआत फूट? सुप्रीम कोर्टात जाण्यास उद्धव ठाकरेंचा स्पष्ट नकार; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:44 IST2025-04-06T16:42:07+5:302025-04-06T16:44:55+5:30
Uddhav Thackeray News: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले असून, आता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी यावरून कोर्टात जाण्यास नकार दिला आहे.

वक्फ कायद्यावरून मविआत फूट? सुप्रीम कोर्टात जाण्यास उद्धव ठाकरेंचा स्पष्ट नकार; म्हणाले...
Uddhav Thackeray News: दोन दिवस दिवसभर वादळी आणि प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेरीस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सही झाली. त्यामुळे हा आता कायदा बनला आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता वक्फ कायद्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता विरोधकाच्या महाविकास आघाडीच्या एकतेबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांच्यासह असोसिएशन फॉर दी सिव्हिल राईट्स (एपीसीआर) या स्वयंसेवी संस्थेने स्वतंत्र याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याआधी काँग्रेसने व एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सदर विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही
वक्फ बोर्डावर आम्ही आमची भूमिका मांडली आहे. काँग्रेसला जायाचे असेल तर जाऊ द्या. आम्हाला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. यापुढे जशी वेळ येईल, तेव्हा याबाबत बोलत राहीन, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करतानाच, वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि मित्रांना देणार, पुढची पायरी ख्रिश्चन कमिटीकडे असेल. जैन बांधव, हिंदू देवस्थाने यांच्या जमिनीही हे लोक घेतील, हे मी आधीच बोललो होतो. कोणत्याही समाजाबाबत यांना प्रेम नाही. यांचे प्रेम फक्त मित्रांपुरते आहे. आमचा याचमुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. तसंच आमची भूमिका आम्ही मांडली आहे. लोकांना तणावग्रस्त आयुष्यात जगायला लावायचं हे यांचे धोरण आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजनेत वाढीव पैसे देण्याचे कबूल केले होते. कर्जमाफी देणार सांगितले होते. लोकांची फसवणूक करून मते मिळवली. धर्माधर्मात भांडण लावायचे, पोलीसांचा ससेमीरा लावायचा, केसेस अंगावर टाकायच्या, दुसरीकडे जमिनी मित्रांना द्यायच्या, याला आमचा विरोध आहे, असे उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले.