उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 20:54 IST2025-10-22T20:53:40+5:302025-10-22T20:54:14+5:30
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीत एकत्रित लढतील अशी चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप या दोन्ही बंधूंनी कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही.

उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव या दोन ठाकरे बंधू यांच्यातील जवळीक वाढली आहे. त्यात कौटुंबिक जिव्हाळा आणि नात्यातील बंध पाहायला मिळत आहे. नुकतेच मनसे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी कित्येक वर्षांनी दिवाळीनिमित्त ठाकरे कुटुंब एकत्रित दिसून आले. त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले आहेत.
राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थवर शुभेच्छा देण्यासाठी पोहचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. हिंदी सक्तीविरोधात एकत्रितपणे आवाज उचलल्यानंतर ठाकरे बंधू यांच्यातील अंतर कमी होताना दिसून आले. विजयी मेळाव्यात पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जात मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या घरी पोहचले होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीत एकत्रित लढतील अशी चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप या दोन्ही बंधूंनी कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र कौटुंबिक सोहळ्यानिमित्त हे दोन्ही बंधू वारंवार एकमेकांच्या भेटी घेत असल्याचे दिसते. पुढील काही महिन्यात महापालिका निवडणुका आहेत. या निवडणुकीत ठाकरे बंधू युती होईल अशी दाट शक्यता आहे. मात्र त्याआधीच आज काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलेल्या विधानामुळे ठाकरे बंधूंची युती चर्चेत आली. राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही आम्ही जाणार नाही, शिवसेना-मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नाही अशी विधाने काँग्रेस नेते करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळाचा नारा देत असल्याचे संकेत यातून मिळाले. त्यातच आज ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने विविध चर्चा सुरू आहेत.
काय म्हणाले होते भाई जगताप?
आम्ही राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आघाडी करणार नाही, मी मुंबई काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना हीच बाब ठामपणे सांगितली होती असं भाई जगताप यांनी म्हटलं होते. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत चांगलीच चर्चा रंगली. त्यानंतर या विधानावर स्पष्टीकरण देत हे माझे वैयक्तिक मत आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या पॉलिटिकल वर्किंग कमिटीच्या बैठकीतही मी माझं हे म्हणणं मांडलं. तेव्हा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला हेसुद्धा तिथे उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यांचीही लढण्याची इच्छा असते. त्यामुळे कार्यकर्त्यांना लढू द्या. म्हणून आम्ही मुंबईत स्वबळावर लढूया असं सांगितले. मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असल्याचे जगताप म्हणाले.