Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:27 IST

मुख्यमंत्र्‍यांच्या या भेटीनंतर सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी मंत्री आशिष शेलार यांच्यातही बैठक झाली.

मुंबई - येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत २ संयुक्त बैठका पार पडल्यात. या बैठकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी कुठेही नव्हती. नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली होती. परंतु शिंदेसेनेसोबत जागावाटपाचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असल्याचं समोर आले आहे. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात मुंबई महापालिकेतील निवडणुकीवर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्‍यांच्या या भेटीनंतर सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी मंत्री आशिष शेलार यांच्यातही बैठक झाली. या दोघांमध्ये २०-२५ मिनिटे चर्चा करण्यात आली. महायुती म्हणून महापालिका निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे अशी तटकरेंनी भूमिका मांडली. गेल्याच आठवड्यात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत बीएमसीसह इतर महापालिकांमध्ये महायुतीने लढले पाहिजे, त्यात राष्ट्रवादीचा सहभाग असावा अशी चर्चा केली होती अशीही माहिती तटकरेंनी दिली. 

नवाब मलिका मुद्दा मागे पडला...

मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिकांमधील महायुतीच्या चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वरिष्ठ पातळीवर चर्चा करत आहेत. त्यात राष्ट्रवादीने मुंबईत ५० जागांचा प्रस्ताव भाजपासमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे निवडणूक प्रभारी आहे. त्यांच्यासोबत सुनील तटकरे यांची जागावाटपावर चर्चा होत आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा मुद्दा मागे पडून महायुतीत ट्विस्ट आल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिंदेसेनेला 'त्या' ८४ जागा देण्यास भाजपाचा नकार

२०१७ च्या निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या सर्व ८२ जागांवर भाजपाने दावा केला असून शिवसेनेने मिळविलेल्या ८४ जागा देण्यास भाजपाने स्पष्ट नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजपाने पहिल्या बैठकीत शिंदेसेनेला केवळ ५२ जागांची ऑफर दिली होती. मात्र शिंदेसेनेने गेल्या निवडणुकीतील ८४ जागा आणि अतिरिक्त जागांसह एकूण १२५ जागांची मागणी केली. एकूण १५७ जागांचा निर्णय झाला. अद्याप सुमारे ७० जागांवर तिढा कायम आहे. त्यातच भाजपा आणि राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठकीमुळे शिंदेसेनेला महायुतीत डच्चू मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Election Twist: BJP-NCP Meeting, Shinde Sena sidelined?

Web Summary : Ahead of BMC polls, BJP and NCP leaders met, discussing seat sharing, sidelining Shinde Sena. BJP eyes its 82 seats, rejecting Shinde Sena's demand for 84. Talks continue amidst alliance dynamics.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६भाजपाआशीष शेलारसुनील तटकरेएकनाथ शिंदे