"एसपी घरगड्यासारखे वागले, आम्हाला फरफटत नेले"; साताऱ्याच्या राड्यावर शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:37 IST2026-03-23T10:25:50+5:302026-03-23T10:37:14+5:30
साताऱ्याच्या राड्यावर शंभूराज देसाईंचा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप

"एसपी घरगड्यासारखे वागले, आम्हाला फरफटत नेले"; साताऱ्याच्या राड्यावर शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
Satara Zilha Parishad Clash: सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात शुक्रवारी एकाच वेळी विजयाचा गुलाल आणि संघर्ष पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपने पहिल्यांदाच सत्ता काबीज करत इतिहास रचला असला, तरी या प्रक्रियेला हिंसक वळण लागले. या अभूतपूर्व रणधुमाळीत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांच्या धक्काबुक्कीचा सामना करावा लागला असून, त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेचे तीव्र पडसाद थेट राज्याच्या विधिमंडळात उमटले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला. शिंदेसेनेने भाजपला धूळ चारत विजय तर मिळवला, मात्र मतदानाच्या वेळी झालेल्या प्रचंड गदारोळामुळे जिल्हा परिषद परिसराचे रूपांतर रणांगणात झाले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. या गोंधळात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना साध्या वेषातील पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. यात त्यांच्या डाव्या हाताला जखम झाली असून त्यांना अक्षरशः फरफटत नेण्यात आले. या घटनेवर विधिमंडळात बोलताना देसाई यांनी संताप व्यक्त केला.
"आमच्याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ५५ पैकी सदस्य ३७ होते. भारतीय जनता पक्षाकडे २८ सदस्य होते. त्यामुळे बहुमत असताना त्यांनी काही उचापती केल्या. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या दोन सदस्यांना त्यांनी नेले. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या दोघांनाही त्यांनी नेले. ३७ वरून आम्ही ३३ वर आलो. तरी सुद्धा मतदानाला जाताना आम्ही ३३ सदस्य सोबत घेऊन गेलो होतो. त्यानंतर जे राष्ट्रवादीचे सदस्य आमच्या सोबत होते त्यांचेच अपहरण झालं अशी खोटी तक्रार देण्यात आली. आमच्याच दोन सदस्यांनी अपहरण केलं असं सांगण्यात आलं. पण ते आमच्या सोबतच होते.. पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यायचं होतं तर आमची जिथे मीटिंग सुरू होती तिथे साध्या वेषातील पोलीस होते," असं पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
"मतदान कक्षाच्या दहा-पंधरा मीटर अंतरावर असताना त्यांना पकडण्यात आलं. पोलिसांनी आमच्याशी झटापटी केली. दहा दहा पोलीस मला ओढत होते. एका बाजूला जेलमध्ये असलेल्या आरोपींना मतदानासाठी आणलं जातं पण आमच्या सोबत असलेल्या सदस्यांना मतदान करू दिलं नाही. मला धक्काबुक्की झाल्याने हाताला लागलं. खासदार नितीन काका पाटील हे खाली पडले. आमदार मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली. हे सगळं पाहिल्यानंतर आज शिवसेना विधिमंडळाच्या बैठक होणार आहे. त्यात सगळा वृत्तांत मी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहे. पक्षाच्या आमदारांचे मत विचारात घेऊन त्याबाबत पुढील निर्णय घेऊ," असेही शंभूराज देसाई म्हणाले.
महेश शिंदेंबाबत भूमिका स्पष्ट
महेश शिंदे बाबत तुमचे मत काय असं विचारलं असता शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "मी सुरुवातीपासून सांगतोय की प्रिया ताई शिंदे या महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्या भाजप प्रदेश कार्यकारणीच्या उपाध्यक्ष आहेत. पण आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघातील जे दोन सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले त्यांना उमेदवारी जाहीर होताच महेश शिंदे यांचे लोक घेऊन गेले. त्यांच्या सौभाग्यवती भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्या दोन सदस्यांना नेऊन जिथे भाजपचे सदस्य बसले होते तिथे जाऊन बसवलं. हे करून त्यांनी सरळ सरळ व्हिपचे उल्लंघन केले. महेश शिंदे यांची ही भूमिका जगजाहीर झाली आहे. मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. याबद्दल पक्षाच्या बैठकीत मत मांडू. त्यावर पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. ज्या दोन सदस्यांनी व्हिपचे उल्लंघन केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे," असेही शंभूराज देसाई यांनी म्हटलं.
पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप
"तिथे घडलेला सगळा विस्तृत वृत्तांत मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातलेला आहे. पण सातारा जिल्ह्यात कधीच पोलिसांकडून लोकप्रतिनिधींना अशी हाणामारी झाली नव्हती. सातारा जिल्हा सुसंस्कृत जिल्हा आहे. तिथे साध्या वेषातील शंभर पोलीस होते. सातारचे पोलीस अधिक्षक त्यादिवशी अक्षरशा घरगड्यासारखे वागले. त्यांनी कशाची तमा बाळगली नाही. आम्हाला अक्षरशः फरफटत नेले. ही सगळी वस्तुस्थिती पक्षाच्या बैठकीत मांडू आणि मग पक्ष यावर निर्णय घेईल. याबाबत कॅबिनेट बैठकीत सुद्धा आम्ही हा विषय मांडू. आम्ही दोन मंत्र्यांनी जे भोगले ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत. लोकशाहीचा वीस तारखेला साताऱ्यामध्ये खून झाला आणि हे सत्य आहे. निवडणुकीआधी मी सातत्याने प्रयत्न केला पण त्यांचा प्रतिसाद आला नाही. त्यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून आमचा आणि राष्ट्रवादीचे एकत्र लढण्याचे ठरले. एकदा अनुभव आल्यानंतर परत परत त्यांच्याकडे जाण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही याबाबतचा निर्णय पक्ष घेईल," अशी भूमिका शंभूराज देसाईंनी मांडली.