Mumbai Rain Forecast: ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यभरात गडगडाटी अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस महत्त्वाचे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 04:41 IST2025-05-16T04:41:45+5:302025-05-16T04:41:45+5:30
Mumbai Weather Update: ३१ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Mumbai Rain Forecast: ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यभरात गडगडाटी अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस महत्त्वाचे...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यासह देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे. दुसरीकडे ३१ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१५ ते २२ मे दरम्यान महाराष्ट्र, ओडिशासह दक्षिण व ईशान्य भारतातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. २२ ते २९ मेदरम्यान राज्यासह पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण व पूर्व भारतात पाऊस सरासरी ओलांडेल. २९ मे ते ५ जूनदरम्यान कर्नाटक, बंगालच्या खाडी किनारी आणि ५ ते १२ जूनदरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल.
अरबी समुद्रावर आणि तेलंगणा राज्यावर केंद्र असलेल्या दोन चक्रीय वाऱ्यांच्या संयोगातून सध्या वळवाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत या पावसाचा प्रभाव अधिक असेल. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ.
पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मॉन्सून गुरुवारी अरबी समुद्र, मालदिव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागांत पुढे सरकला आहे. - कृष्णानंद होसाळीकर, हवामानतज्ज्ञ.