"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:43 IST2025-11-17T12:39:12+5:302025-11-17T12:43:04+5:30
Raj Thackeray Balasaheb Thackeray News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले. राज ठाकरेंनी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपलला खरमरीत भाषेत सुनावले आहे.

"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
Raj Thackeray tribute Balasaheb Thackeray: "जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं", अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला खडेबोल सुनावले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली. यात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही सुनावले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देत राज ठाकरेंनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानिमित्ताने राज ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावरही भाष्य केले आहे.
"हिंदू अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच"
"शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच", अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
पुढे राज ठाकरे लिहितात, "पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही."
एकनाथ शिंदेंवर टीकेची तोफ?
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उल्लेख करता निशाणा साधला. शिवसेनेचे मुख्य नेता असलेल्या शिंदेंबद्दल ठाकरेंनी म्हटले आहे की, "बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही!."
शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता… pic.twitter.com/Z223LMW51S
— Raj Thackeray (@RajThackeray) November 17, 2025
"फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन!", अशा शब्दात राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.