Raj Thackeray: अशाप्रकारे बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झालेल्या, भाजपा तेव्हा...; राज ठाकरेंचा जोरदार सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:06 IST2026-01-04T14:05:43+5:302026-01-04T14:06:50+5:30
Raj Thackeray BMC election PC: मुंबई महानगरपालिकेचा वचननामा जाहीर करताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Raj Thackeray: अशाप्रकारे बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झालेल्या, भाजपा तेव्हा...; राज ठाकरेंचा जोरदार सवाल
मुंबई: "बडोद्याचे साम्राज्य मराठ्यांचे असूनही तिथे स्थानिक भाषिकच महापौर होतात. मग मुंबईत मराठी महापौर होण्यात गैर काय? आम्ही हिंदू आहोत, पण 'हिंदी' नाही, आम्ही मराठी आहोत," अशा प्रखर शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला अजेंडा स्पष्ट केला. मुंबई महानगरपालिकेचा वचननामा जाहीर करताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले.
उद्धव आणि राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेचा वचननामा आज जाहीर केला. यावेळी दोन्ही ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.
पेशव्यांच्या काळात तीन साम्राज्ये उभी राहिली. गुजरात बडोदा, सिंधिया... बडोद्याचे साम्राज्य मराठ्यांचे मग महापौर गुजराती कसा, या ठिकाणी तेथील स्थानिक भाषिकच महापौर होतात. यामुळे आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. मराठी आहोत. यामुळे आम्ही मुंबईत महाराष्ट्रीय मराठीच महापौर करणार, यात गैर काय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज्यात सुरू असलेल्या 'बिनविरोध' निवडणुकांच्या राजकारणावर राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा अशा निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा हाच भाजप सर्वोच्च न्यायालयात गेला होता. आता महाराष्ट्रात काय चालले आहे? तुम्ही आज जे पेरताय, तेच उद्या तुम्हाला कापायला लागेल. तुम्ही जेव्हा सत्तेत आला तेव्हा काँग्रेसने हे केले, असे केले म्हणून आम्ही करतो असे सांगत आहात. उद्या जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि जेव्हा त्यांच्याकडून याच्या दामदुप्पट केले जाईल तेव्हा मात्र तक्रार करू नका. याचा विचार आताच्या सत्ताधाऱ्यांनी करायला हवा. आपण काय टाकतोय या राज्यात, महाराष्ट्रात युपी-बिहारसारखे राजकारण केले जातेय. अशाप्रकारे महाराष्ट्राचे, पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, जे राजकारणात येऊ घालत आहेत, त्यांचे विचार बदलणे हे घातक आहे," असा इशारा त्यांनी दिला.
केंद्र आणि राज्याला दिले आव्हान
वचननाम्यातील कामांचा उल्लेख करत राज म्हणाले की, "आम्हाला मुंबईसाठी जी चांगली कामे करायची आहेत, त्याला राज्य आणि केंद्राची संमती लागेल. त्यांनी या कामांना विरोध करून दाखवावा. केंद्राने परवानगी नाकारली तर ते जनतेसमोर येईल आणि मग आम्ही बघून घेऊ."