मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 05:24 IST2025-07-27T05:22:45+5:302025-07-27T05:24:23+5:30

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीतही चर्चा न झाल्याची माहिती; अजित पवार घेणार अंतिम निर्णय.

there is no possibility of a cabinet reshuffle in maharashtra and decision is only regarding agriculture minister manikrao kokate | मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच

मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मंत्रिमंडळात कोणताही फेरबदल केला जाणार नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत काय तो निर्णय होईल, अन्य कोणताही बदल केला जाणार नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्लीत होते. तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदल होणार अशा वावड्या उठल्या. प्रत्यक्षात फडणवीस यांनी अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्यासह कोणाशीही मंत्रिमंडळ बदलासंदर्भात सल्लामसलत केली नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात शनिवारी पत्रकारांना सांगितले की, मंत्रिमंडळ फेरबदलाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. आमचे दोन मित्रपक्ष आहेत, त्यांची काही मते याबाबत असतील तर ते मुख्यमंत्र्यांना सांगतील. राज्यातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय नेतृत्व वा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत प्रदेश भाजपच्या कोणत्याही नेत्याशी चर्चा केलेली नाही.
सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचे अध्यक्ष करणार, ॲड. राहुल नार्वेकर यांना मंत्री करणार, गिरीश महाजन यांना डच्चू देणार अशा बातम्या सध्या फिरत आहेत, पण त्या अफवा असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

कृषिमंत्री कोकाटे उद्या पवारांना भेटणार

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार की त्यांचे खाते बदलणार की त्यांना कायम ठेवणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या, सोमवारी (२८ जुलै) मुंबईत भेट घेऊन त्यांची बाजू मांडणार आहेत. अजित पवार हे उद्या, सोमवारीच प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्याशीही कोकाटेंच्या विषयावर चर्चा करतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील.

कोकाटेंचे शनिदेवाला साकडे

नंदुरबार : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी नंदुरबारजवळच्या शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात विधिवत पूजा करून शनिदेवाला अभिषेक केला. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी त्यांनी शनिदेवाला साकडे घातले असे म्हटले जात आहे. गेल्या काही काळापासून मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयीची वादग्रस्त वक्तव्ये आणि विधिमंडळात व्हिडीओ व्हायरलमुळे चर्चेत आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, हे येथे उल्लेखनीय.

 

Web Title: there is no possibility of a cabinet reshuffle in maharashtra and decision is only regarding agriculture minister manikrao kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.