"मग दादांनी पक्ष चोरला, हे कसं"?; सुनेत्रा पवारांचा पहिल्यांदाच थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:37 PM2024-03-26T23:37:45+5:302024-03-26T23:43:34+5:30

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने आमचा पक्ष चोरला, माझा बाप चोरला असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधतात

Then how did Dada steal the party?; Sunetra Pawar's direct aim at Supriya Sule | "मग दादांनी पक्ष चोरला, हे कसं"?; सुनेत्रा पवारांचा पहिल्यांदाच थेट निशाणा

"मग दादांनी पक्ष चोरला, हे कसं"?; सुनेत्रा पवारांचा पहिल्यांदाच थेट निशाणा

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीतील जागावाटपावर भाष्य केलं. तसेच, बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार असून दोन दिवसांत सर्वच उमेदवारांची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार ह्याच उमेदवार असतील, अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली असून गावदौरे व गाठीभेटी सुरू आहेत. याच अनुषंगाने एका गावातील सभेत बोलताना त्यांनी नाव न घेता थेट सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने आमचा पक्ष चोरला, माझा बाप चोरला असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधतात. तर, अजित पवार यांनीही राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळवल्यानंतर त्यांच्यावरही पक्ष चोरल्याची टीका शरद पवार गटातील नेत्यांकडून करण्यात आली. आता, बारामतीच्या मैदानात लोकसभेची तयारी करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांची पाठराखण करत, थेट टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे. तसेच, अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी समर्थनही केलं. 

''विकासाला साथ दिली पाहिजे, या हेतुनेत दादांनी ही भूमिका घेतली. दादांसोबत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनची मंडळी आहे, जवळजवळ ती ८० टक्के मंडळी दादांसोबत आहे. मग, लोकशाही जर असेल आणि ८० टक्के लोक दादांसोबत आहेत. मग, पक्ष चोरला, किंवा चोरुन नेला, किंवा चुकीचं वागला, हे कसं?, असा सवालच सुनेत्रा पवार यांनी विचारला आहे. सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना व खा. सुप्रिया सुळेंना टोला लगावला. तसेच, अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीतील शिवसेना नेत्यांवरही निशाणा साधला, असे म्हणता येईल.

दरम्यान, बारामतील लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे दिसून येते. त्यातच, महादेव जानकर महायुतीत आले म्हणून बारामतीची जागा दिली असं नाही. बारामतीच्या जागेवर राष्ट्रवादीच लढणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, तुमच्याच मनातील उमेदवार येथे असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे, पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: Then how did Dada steal the party?; Sunetra Pawar's direct aim at Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.