Join us
Daily Top 2Weekly Top 5

"... तर लाठीचार्ज नक्कीच विसरुन जाऊ"; अखेर रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांकडे निवदेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 09:49 IST

सरकारच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीतरी सभास्थळी यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले होते

मुंबई - बेरोजगार, युवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेनंतर मंगळवारी नागपुरात राडा झाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसात अर्धा तास झालेल्या झटापटीमुळे टेकडीरोडवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर, अखेर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

सरकारच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीतरी सभास्थळी यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले होते. मात्र, सभा संपल्यानंतरही कुणी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह निवेदन ठेवलेल्या बैलगाडीसह विधानभवनाकडे कूच केले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यात  झटापट झाली. लाठीचार्जनंतर  कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, सलील देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पूजा पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना युवा संघर्ष यात्रेतील मागण्यांचे निवेदन दिले. नागपूर विधिमंडळात रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी, ८०० किमी चालत काढलेल्या संघर्ष यात्रेत भेटलेल्या युवकांनी, शेतकऱ्यांनी, नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे आणि मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिले. तसेच, युवा आणि जनतेच्या या मुद्द्यांवर या अधिवेशनात निर्णय घेतला तर आमच्यावर झालेला लाठीचार्ज आम्ही नक्कीच विसरून जाऊ, असेही आमदार पवार यांनी म्हटले. 

 

दरम्यान, युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा नागपुरात आयोजित करण्यात आली होती. या सांगता सभेला राष्ट्रवादीचेे संस्थापक शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवत युवकांना मार्गदर्शन केलं.

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईनागपूरएकनाथ शिंदे