Join us  

राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अर्थसहाय्य करा; मुख्यमंत्र्याचे जागतिक बँकेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 3:12 PM

आज ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई- राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला आहे. त्यासाठी जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांना केले. 

आज ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाचप्रकारे राज्यातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  

राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे ५००० गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बॅंकेचे सहाय्य लाभले असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले. 

दरम्यान, सदर बैठकीत निवृत्त सनदी अधिकारी प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकासच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,प्रकल्प संचालक परिमलसिंग उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकारवर्ल्ड बँकभारतशेतकरी