राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:38 IST2025-12-19T09:37:25+5:302025-12-19T09:38:26+5:30
'जेन झी'ला डोळ्यांसमोर ठेवून टपाल विभागाने मुंबईतील पहिले 'जेन झी' टपाल कार्यालय आयआयटी मुंबईमध्ये गुरुवारपासून सुरू केले.

राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
मुंबई : 'जेन झी'ला डोळ्यांसमोर ठेवून टपाल विभागाने मुंबईतील पहिले 'जेन झी' टपाल कार्यालय आयआयटी मुंबईमध्ये गुरुवारपासून सुरू केले. या प्रकारचे हे राज्यातील पहिलेच टपाल कार्यालय आहे.
महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांच्या हस्ते या नव्या टपाल कार्यालयाचे लोकार्पण झाले. मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालिका कैया अरोरा, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे, कुलसचिव गणेश भोर्कदे, तसेच इंडिया पोस्टचे अधिकारी आणि कर्मचारी आणि आयआयटी मुंबईचे अधिकारी उपस्थित होते.
या टपाल कार्यालयाची अंतर्गत रचना, भित्तिचित्रे आणि सजावट भारतीय टपाल विभागाच्या इन-हाऊस टीमने आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केली आहे. येथे मोफत वाय फाय, कॅफेटेरिया, मिनी लायब्ररी, संगीत कोपरा, क्यूआर-आधारित सेवासुविधा आहेत. विद्यार्थ्यांना स्पीड पोस्ट सेवांवर १० टक्के, तर 'बल्क बुकिंग'वर ५ टक्के सवलत मिळेल.
टपाल कार्यालयांना युतकांसाठी संवादात्मक आणि अनुभवप्रधान समाज म्हणून विकसित करण्याचा भारतीय टपाल विभागाचा हा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. परंपरा आणि नवोन्मेष यांचा संगम साधत टपाल सेवांना नव्या पिढीशी जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशात 'जेन झी' टपाल कार्यालय सुरू आहेत.