सरकारचा डाव फसला; मनोज जरांगे मुंबईकडे निघताच वडेट्टीवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 04:39 PM2024-02-25T16:39:00+5:302024-02-25T16:40:02+5:30

राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केली  आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

The governments plan failed congress vijay wadettiwar criticizes government after Manoj Jarange left for Mumbai | सरकारचा डाव फसला; मनोज जरांगे मुंबईकडे निघताच वडेट्टीवारांचा हल्लाबोल

सरकारचा डाव फसला; मनोज जरांगे मुंबईकडे निघताच वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Congress Vijay Wadettiwar ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत आपण फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर उपोषण करण्यासाठी जात आहोत, अशी घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे सरकारची कोंडी झालेली असताना काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. "सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आधी मराठा आणि ओबीसी असा वाद लावून नंतर दोन्ही समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा सरकारचा डाव होता. मात्र तो डाव आता फसला आहे," असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

"आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोर्टात न टिकणारं आरक्षण दिलं आहे," असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावेळी राज्यातील अन्य प्रश्नांवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारला लक्ष्य केलं.

"सरकारच्या आशीर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केली  आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. राज्याला उद्धवस्त करण्याचा, खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम सरकारकडून सुरू आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही," असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीने या फसव्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, "शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन खरेदी केली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपयांचे अनुदान दिले नाही. तरीही सरकार टेंभा मिरवते आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. त्यामुळे आम्ही या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. यांच्या पापात आम्ही सहभागी होणार नाही. हे फसवं चहापान आम्ही घेणार नाही," अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

Web Title: The governments plan failed congress vijay wadettiwar criticizes government after Manoj Jarange left for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.