मंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आणखी चिघळला; शिंदेसेनेकडून नाईक यांना डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 07:55 IST2026-02-17T07:54:42+5:302026-02-17T07:55:18+5:30
...तर वनमंत्री काय कामाचे? जे कमावले ते या वयात का घालवताय? आ. नीलेश राणेंचा निशाणा

मंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आणखी चिघळला; शिंदेसेनेकडून नाईक यांना डिवचले
मुंबई : नवी मुंबईवर हुकूमत कोणाची, यावरून महानगरपालिका निवडणुकीपासून सुरू झालेला भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. राज्यात वन शिल्लक राहत नसताना वनमंत्री काय कामाचे? असा थेट सवाल करत शिंदेसेनेकडून गणेश नाईक यांना सोमवारी डिवचण्यात आले आहे.
गणेश नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदेसेनेकडून त्याला ठोस प्रत्युत्तर देण्यात आले आहे. खुमखुमी असेल तर माझ्याविरुद्ध कल्याणमधून लढा, असे आव्हान खा. श्रीकांत शिंदे यांनी दिल्यानंतर सोमवारीही शिंदेसेनेच्या नेत्यांनी नाईकांवर निशाणा साधला.
वनमंत्री गणेश नाईक यांना भाजपमध्ये राहून उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रवृत्ती विरोधात लढता येणार नाही. त्यांनी स्वगृही अर्थात उद्धवसेनेत परतावे.
खा. संजय राऊत, नेते, उद्धवसेना
दबाव आणू नका : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाईक यांचे नाव न घेता टीका करताना म्हटले की, सरकार विकासासाठी काम करत आहे. कोणीही व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा स्थानिक पातळीवर दबावतंत्र वापरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये.
नगरविकास खाते टार्गेट; भूखंड बिल्डरांच्या घशात
मंत्री गणेश नाईक यापूर्वी म्हणाले होते की, नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी जे भूखंड मागितले होते ते बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत. नगरविकास खात्यातील लोकांनी हे कर्म दरिद्री काम केले आहे.
गणेश नाईक लोकांकरिता आमदार आणि मंत्री झाला, मी यावर बोलू शकलो नाही तर ते मंत्रिपद चाटायचं आहे का? नाईक यांच्या वरील आरोपाल खा. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी शिंदेसेनेच्या नेत्यांनी नाईकांवर टीका केली.
एकनाथ शिंदेंवरील टीका सहन करणार नाही : राणे
आमदार नीलेश राणे यांनी मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. वनच राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? जे कमावलंय ते या वयात का घालवत आहात? एकनाथ शिंदे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही. ज्या भाषेत टीका केली त्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशारा राणे यांनी दिला आहे.
कोकणातील ज्या काही वन जमिनी आहेत, त्याची काय अवस्था झाली आहे? लाकूडतोडी मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्ही महायुतीचे मंत्री आहात. एकत्र राहून सतत दबावाचे राजकारण करणे योग्य नाही. प्रत्येकाला आपापली मर्यादा समजली पाहिजे, असेही नीलेश राणे यांनी म्हटले आहे.