मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:09 IST2025-12-10T10:04:41+5:302025-12-10T10:09:17+5:30
Jogeshwari Youth Death News: जानेवारी २०२५ मध्ये १७ वर्षीय मुलाचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला होता. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. पण, तपास केल्यानंतर वेगळेच कारण समोर आले.

मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ
२१ जानेवारी २०२५ रोजी एका तरुणाचा जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर १७ वर्षीय तरुणाचा लोकल ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात मोटरमनची साक्ष नोंदवली. त्यावेळी मोटरमनने मुलाने रेल्वेसमोर उडी मारल्याचे सांगितले. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातून वेगळेच कारण समोर आले.
१७ वर्षीय मुलगा जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. त्याचे वडील निलेश हे चालक आहेत. मयत मुलगा १२ वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता आणि सर्वोदय नगरमधील दीपक क्लासेसमध्ये ट्यूशनसाठी जायचा.
आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला अन्...
दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मयत विद्यार्थ्याला त्याच्या आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला होता. मोबाईल मिळाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अकाऊंट सुरू केले. टेलिग्रामवरच त्याची अशा काही लोकांसोबत ओळख झाली, ज्यांनी त्याला पैसे कमवण्याचे आमिष दाखवले.
पोलिसांनी मृत्यूचे कारण कसे शोधले?
२१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ८.१० वाजता १७ वर्षीय विद्यार्थ्याने जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवर आत्महत्या केली. मोटरमनचा जबाब नोंदवल्यानंतर आत्महत्येची बाब समोर आली. पोलिसांनी मयत मुलाच्या आईवडिलांकडून त्याला कसला ताण होता का? याची माहिती घेतली. त्यांनी असा कुठला ताण त्याला नव्हता, असे सांगितले आणि या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती पोलिसांना केली.
पोलिसांनी त्याच्या मित्राकडून त्याच्याबद्दल माहिती घेतली. त्यानंतर तांत्रिक पुरावे म्हणून त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. त्यातील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यात त्याने टेलिग्राम अॅपवरून काही लोकांशी चँटिग केल्याचे समोर आले. डिसेंबर २०२४ पासून तो या लोकांनी बोलत होता. त्यात त्यांनी रेटिंग देऊन पैसे कमवण्याचे ऑफर दिली होती.
या लोकांनी दिलेले काम त्याने पूर्ण केले. त्यानंतर त्याला जास्त नफा कमावण्यासाठी जास्त पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. त्याने ३१ डिसेंबर २०२४ ते २१ जानेवारी २०२५ या काळात ४९ हजार रुपये युपीआयद्वारे त्या लोकांना पाठवले.
पाच वेळा पाठवले पैसे आणि नंतर आत्महत्या
मुलाने पाच वेळा वेगवेगळी रक्कम पाठवली. त्यातील दोन व्यवहार हे आत्महत्या केली, त्या दिवशीचेच आहेत. पैसे पाठवल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि तणावातून त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
२१ जानेवारी २०२५ रोजी मुलगा नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही म्हणून आईवडील घाबरले. त्यांनी शोधाशोध घेतली, पण तो कुठेच सापडला नाही. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचवेळी जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एका मुलाला ट्रेनने धडक दिल्याची माहिती मिळाली. त्याला कूपर रुग्णालयात नेले असल्याचे कळले.
आईवडील तिथे गेल्यानंतर त्याची ओळख पटली. यावेळी त्याचा फुटलेला मोबाईल घटनास्थळी मिळाला. तो मोबाईल पोलिसांना देण्यात आला. त्यातूनच त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्या खात्यावर मयत मुलाने युपीआयद्वारे पैसे पाठवले असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.