धन्यवाद सरकार; आता संपूर्ण आरे जंगल घोषित करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 04:27 AM2020-09-04T04:27:19+5:302020-09-04T04:28:03+5:30

आरेच्या एकूण जवळपास ३ हजार २०० एकर जागेपैकी ६०० एकर जंगल घोषित करण्याची योजना जाहीर झाली. हा मुंबईकरांचा विजय आहे,

Thank you Government; Now declare the entire Aarey forest | धन्यवाद सरकार; आता संपूर्ण आरे जंगल घोषित करा

धन्यवाद सरकार; आता संपूर्ण आरे जंगल घोषित करा

googlenewsNext

मुंबई : आरे वाचवण्यासाठी मुंबईकर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने गेली ५ वर्षे लढत आहेत. आता आरेच्या एकूण जवळपास ३ हजार २०० एकर जागेपैकी ६०० एकर जंगल घोषित करण्याची योजना जाहीर झाली. हा मुंबईकरांचा विजय आहे, असे म्हणत आरेतील कार्यकर्ते, आंदोलक, पर्यावरणतज्ज्ञांनी सरकारचे आभार मानले. संपूर्ण आरे लवकरच जंगल घोषित करा, अशी मागणीही त्यांनी केली.

वने संरक्षित होणे गरजेचे
शहरातील हरित ठिकाणांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरी वने निर्माण केली पाहिजेत. हरित ठिकाणे, वने कोणत्याही किमतीवर संरक्षित करावीच लागतील. जगभरातील अनेक शहरे स्वच्छ हवेसाठी, हरित ठिकाणे वाढवण्यासाठी, हवामान बदलाच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी मानव निर्मित शहरी वने तयार करत आहेत.
- भगवान केशभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन

लढा अजूनही सुरूच
मागचे सरकार हे मान्य करत नव्हते की आरे जंगल आहे. आताचे सरकार आरे जंगल आहे हे मान्य करत आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की संपूर्ण आरे जंगल म्हणून घोषित झाले पाहिजे. आमचा विजय झाला आहे. मात्र लढा संपलेला नाही. तो सुरूच आहे.
- स्वप्निल पाथरे,
आरे संवर्धन समिती

नोटिफिकेशन महत्त्वाचे : सरकारने आरे येथील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव ठेवल्याचे म्हटले आहे. नोटिफिकेशन काढल्यानंतर या ६०० एकरमध्ये नेमका कोणता परिसर आहे याची माहिती मिळेल. सूचना-हरकती नोंदविल्या जातील. कोणी हक्क दाखविले नाहीत, सूचना-हरकती नोंदविल्या गेल्या नाहीत तर ३ महिन्यांत या जमिनीची नोंद सरकारी दफ्तरी वन म्हणून होईल.
- झमन अली, विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय

आरे जंगलच आहे : निर्णयाचे स्वागत आहे. आरेमध्ये ही ६०० एकर जागा आहे. मात्र ही जागा नेमकी कुठे आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र सरकार वनांचा विचार करत आहे हेच महत्त्वाचे आहे. कारण आम्ही सातत्याने म्हणत आहोत की आरे जंगल आहे. आता कुठे सरकार बाहेर येऊन बोलत आहे की आरे जंगल आहे.
- अमृता भट्टाचार्य, आरे आंदोलक

मुंबईकरांचा विजय : सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. आरे जंगल होते, आहे आणि राहील. प्रत्येक मुंबईकर यासाठी आवाज उठवत आहे. या निर्णयामुळे सर्व मुंबईकरांचा विजय झाला. अशाच प्रकारे मुंबई शहराचे पर्यावरण वाचविण्यासाठी सर्वांना एकत्र आले पाहिजे.
- निकोलस अल्मेडा,
संस्थापक-अध्यक्ष, वॉचडॉग फाउंडेशन

Web Title: Thank you Government; Now declare the entire Aarey forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.