Join us

‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:15 IST

Thackeray Group MP Sanjay Raut Reaction On Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यात २६-२७ महिलांचे सिंदूर पुसले गेले, त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला असता तर करून दाखवले असे म्हणता आले असते, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Thackeray Group MP Sanjay Raut Reaction On Operation Sindoor: निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हीच पुलवामा घडवले का? अशा प्रकारचे आरोप आणि संशय निर्माण व्हावे, असे कुणाला वाटत असेल, तर या सगळ्या कारवाईचे श्रेय त्यांनी घेऊ नये. जर तुम्ही या कारवाईचे श्रेय घेणार असाल, तर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागेल. हे श्रेय फक्त भारतीय सेनेचेच आहे आणि ते त्यांनाच मिळायला हवे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 

पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. हे जे आता कुणी बोलत आहेत, ते सीमेवर बंदुका घेऊन उभे नाहीत किंवा मिसाईल डागायला ते लाहोरला पोहोचलेले नाहीत. अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले आहेत, अशी माझ्याकडे माहिती आहे. युद्ध सरावाची तशी गरज नाही. कारण भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. भारतीय जनतेने तीन युद्ध पाहिली आहेत. भारतीय जनतेने स्वातंत्र्य युद्ध पाहिले आहे. भारतीय जनतेने १९६१, १९६५, १९७१ आणि कारगिलचे युद्ध पाहिले आहे. पिढ्या जरी बदलल्या असल्या तरी भारतीय जनतेच्या नशिबात सातत्याने युद्धजन्य परिस्थिती राहिली आहे. आता २०२५ चे युद्ध आम्हाला सहन करावे लागत आहे. मॉक ड्रिल हे फक्त जनतेला मार्गदर्शन करणे गरजेचे असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

ट्रम्प, पुतिन काय म्हणतात, यावर भारतीय सेनेचे धोरण ठरत नाही

पंतप्रधानांसाठी बंकर तयार केले जातात. इथे काही बंकर तयार करण्यात आलेले नाहीत. जनतेला स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे असते. अनेक देशांत असे केले जाते. भारत देश मोठा आहे. त्यामुळे अनेक गोष्टींची तयारी आम्हाला ठेवावी लागते, असे संजय राऊत यांनी सांगितले. अमेरिका, रशिया यांसारख्या देशांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प काय म्हणतात, पुतिन काय म्हणतात, यावर भारतीय सेनेचे धोरण ठरत नाही. १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्या काळात रशियाने भारताच्या मदतीला आरमार पाठवले होते. तेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होता. रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला. त्याला आम्ही मित्र राष्ट्र म्हणतो. तिथे बसून आम्हाला पाठिंबा देण्याला काय अर्थ आहे. आमचे सैन्य इथे लढत आहे. पहलगाम हल्ल्यात आमचे लोक मारले गेले. हा देश आणि आमचे सैन्य समर्थ आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केले. 

दरम्यान, मोदींनी करून दाखवले म्हणजे काय, मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. खरे म्हणजे मोदींनी आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. ते करून दाखवायला हवे होते. हे मी वारंवार सांगत आहे. २६-२७ महिलांचे सिंदूर पुसले गेले, त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यांचा राजीनामा घेतला असता, तर मोदींनी करून दाखवले, असे म्हणता आले असते. तो पहिला हल्ला असता. आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिली म्हटल्यावर भारतीय सैन्याने करून दाखवले. राज्यकर्ते सीमेवर जाऊन बसत नाहीत. राज्यकर्ते आदेश देतात. सैन्य सक्षम असेल, तर करून दाखवते. याचे श्रेय राजकारण्यांनी घेऊ नये, असे संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लाभारत विरुद्ध पाकिस्तानसर्जिकल स्ट्राइकसंजय राऊतशिवसेनाकेंद्र सरकारभारतीय जवाननरेंद्र मोदीअमित शाह