Sanjay Raut News: मुंबई आणि ठाण्याची लूट करणारे त्यांच्या सरकारमध्ये आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवी, या आमच्या काळात ठेवल्या गेल्या. त्या काय मुंबई लुटल्यामुळे का, ९० हजार कोटींच्या ठेवी जी महापालिका ठेवते, ती लुटल्यामुळे आम्ही ठेवल्या का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडीलाही उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट लोकांपर्यंत जाणारे लोणी आम्ही सर्वांपर्यंत पोहोचविणार. मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांच्या विजयाची हंडी फोडणार, असा दावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांची विकासविरोधी हंडी जनतेने फोडल्याचे सांगितले. दोघांनी एकत्र घोषणा दिल्या. याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, या ९० हजार कोटींची लूट तुम्ही केली. विद्यमान नगरविकास मंत्री किंवा जे मुख्यमंत्री होते, त्यांनी २ लाख कोटींची कामे दिली. तिजोरीत पैसे नाहीत, कुणाला कोणते काम दिले याचा पत्ता नाही. पण या २ लाख कोटींवरील २५ टक्के कमिशन त्यांच्याकडे पोहोचले आहे. त्यात फडणवीस यांचे लोकही आहेत, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही
मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे. लुटमार करणाऱ्यांच्या हंड्या फोडत तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरत आहात. हंडीमध्ये दही, लोणी जे आहे, ते ज्यांनी ओरपून खाल्ले आहे. त्यांच्या हंड्या आपण फोडत आहात, याला काय म्हणायचे, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस तुमच्या आसपास चोर, दरोडेखोर, लफंगे आहेत, त्यांना पाठीशी घालू नका. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटत आहे, गौतम अदानींची हंडी कोण फोडत आहे, हे लोक गौतम अदानींची हंडी फोडणारे लोक आहेत. गौतम अदानींच्या हंडीत जी मलई आहे, ती खाणारे हे लोक आहेत. हे आम्हाला काय सांगत आहेत. धारावीपासून मुंबईतील अनेक महत्त्वाचे भूखंड ज्यांनी अदानींच्या घशात घातले, ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका, आरोप करत आहेत. हा सगळ्यात मोठा जोक आहे. प्रेसिंडट ट्रम्प यांच्यानंतर जर कुणी राजकारणातील जोकर असतील, तर ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊतांनी केलेल्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.