Join us

शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरेंचाच आवाज घुमणार?; शिंदे गटाची माघार, दोन मैदानही ठरवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:24 IST

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं.

मुंबई: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून महिन्याभरापूर्वीच अर्ज करण्यात आले होते. मात्र आता शिंदे गटाने अदसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने हा अर्ज मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे. आमदार सदा सरवणकर यांनीच शिवाजी पार्क येथील मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे, असा अर्ज पालिकेला दिला होता. मात्र आज आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेणार आहे. त्याऐवजी आम्ही क्रॉस मैदान आणि आझाद मैदानासाठी पालिकेला अर्ज दिल्याची माहिती सदा सरवणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत भांडायचे नाही. त्यांना फक्त सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे, दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेणार असल्याचं, असं दीपक केसरकर म्हणालेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहे. तसेच, आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचं राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरं मैदान आम्ही घेतलेलं आहे. ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो, हे आता जनतेनं ओळखावं, अशी टीकाही दीपक केसरकर यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर मेळावा कोण घेणार असा पेच निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला होतो. त्यावेळी शिवसेना कोणाची याबाबत निर्णय झालेला नव्हता. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्याने यंदा देखील ठाकरेंचाच शिवाजी पार्कवर आजाव घुमणार असल्याचं दिसून येत आहे. येत्या रविवारपर्यंत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष