साताऱ्यातील राड्यावरून जुंपली; भाजप-शिंदेसेनेत प्रचंड तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:28 IST2026-03-24T09:28:46+5:302026-03-24T09:28:46+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणावही यावेळी स्पष्टपणे दिसून आला. 

tensions flare up over the satara zp bjp shinde sena tense | साताऱ्यातील राड्यावरून जुंपली; भाजप-शिंदेसेनेत प्रचंड तणाव

साताऱ्यातील राड्यावरून जुंपली; भाजप-शिंदेसेनेत प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि भाजपने सदस्यांची केलेली पळवापळवी यावरून भाजप-शिंदेसना या दोन मित्रपक्षांमध्ये सोमवारी विधिमंडळात प्रचंड तणाव निर्माण झाला. साताराचे पोलिस अधीक्षक तुषार जोशी आणि अन्य दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला सकाळी विधान परिषदेत दिले. दुपारी सभापती राम शिंदे यांनी या निर्देशाला स्थगिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणावही यावेळी स्पष्टपणे दिसून आला. 

एरवी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे चित्र बघायला मिळते, पण सोमवारचा दिवस हा भाजप-शिंदेसेना या दोन सत्तापक्षांमधील ताणतणावांचा होता. सकाळी सव्वानऊला शिंदेसेनेच्या आमदारांची विधानभवनातील पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक होऊन रणनीती ठरविण्यात आली आणि दोन्ही सभागृहांमध्ये आक्रमक होत या आमदारांनी पोलिस अधीक्षक दोशींसह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित/बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली. त्यात केवळ शिंदेसेनेचे आमदारच नाही तर मंत्रीही आक्रमक बनले होते

दोघांमधील तणाव दिसला

विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी सातारावरून चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर फडणवीस-शिंदेंच्या बाजूला मंत्री शंभूराज देसाई येऊन बसले. सातारावरून किती तणाव आहे हे फडणवीस-शिंदे, देसाई बसून बोलत असताना हावभावांवरून दिसले.

निलंबनावर मुख्यमंत्री, तर सातारवरून शिंदे नाराज

विधान परिषदेत शिंदेसेनेचे हेमंत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारामधील घटनाक्रम सांगत पोलिसांनी लोकशाहीचा खून केला, राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासली, छत्रपतींच्या सातारामध्ये निजामशाही चालली, असे म्हणत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चाैकशीची व पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. 

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मागणी झाल्याप्रमाणे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांना सरकारने तातडीने निलंबित करावे असे निर्देश दिले. 

घटनेच्या चौकशीचे आदेश सरकारने लगेच द्यायला हवे होते, या शब्दात नाराजीही त्यांनी बोलून दाखविली. मात्र,  दुपारी सभापती राम शिंदे यांनी या निर्देशांना स्थगिती दिली. उपसभापतींच्या निर्देशांवर आपण मंगळवारी सभागृहाला माहिती देऊ असे ते म्हणाले. 

फडणवीस नाराज, पण तुमची दादागिरी कशासाठी?

ज्या पद्धतीने सकाळीच निलंबनाचा निर्णय करण्यात आला त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री शिंदेसेनेचे उदय सामंत यांच्याजवळ नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्याचवेळी साताऱ्यात भाजपने जे केले ते सहन कसे करायचे, पोलिसांच्या मदतीने केलेली दादागिरी सहन करायची का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी बावनकुळे भेटायला गेले तेव्हा केला, अशी माहिती आहे.
 
मंत्री बावनकुळे, सामंत याची धावपळ

भाजप-शिंदेसेनेतील कमालीचा तणाव निवळावा यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) आणि उद्योग मंत्री उदय सामंत (शिंदेसेना) यांनी दोन-एक तास धावपळ केली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सभापती राम शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ते भेटले. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही शिंदेसेनेचे मंत्री, आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरून गोंधळ घालू लागले. तेव्हा बावनकुळे, उदय सामंत यांनी एकमेकांशी बोलून सर्वांना शांत केले. 

संपूर्ण चाैकशी करू; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले, की सातारामध्ये पोलिस बळाच्या आधारे लोकशाहीचा खून करण्यात आला, गळा घोटला गेला. महाराष्ट्राच्या इतिहासात  असे यापूर्वी कधीही घडलेले नव्हते. आरोपींना पकडतात तसे पोलिस मंत्र्यांना घेऊन गेले. त्यावर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल, तसेच मंगळवारी आपण सविस्तर निवदेन करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सायंकाळी दोघांमध्ये बैठक
होऊन चर्चा झाली.
 

Web Title : सतारा विवाद बढ़ा: भाजपा-शिंदे सेना में परिषद चुनावों पर तनाव।

Web Summary : सतारा परिषद चुनाव विवाद ने महाराष्ट्र में भाजपा और शिंदे सेना के बीच तनाव पैदा कर दिया। पुलिस अधिकारियों के लिए निलंबन आदेश जारी किए गए, फिर रोक लगा दी गई। मुख्यमंत्री फडणवीस और उपमुख्यमंत्री शिंदे के बीच असहमति दिखी, जिसके बाद मंत्रियों ने हस्तक्षेप किया और पूरी जांच का वादा किया।

Web Title : Satara dispute escalates: BJP-Shinde Sena tension flares over council polls.

Web Summary : Satara council poll dispute triggered tension between BJP and Shinde Sena in Maharashtra. Suspension orders for police officers were issued, then stayed. Chief Minister Fadnavis and Deputy CM Shinde showed visible disagreement, prompting ministers to mediate and promise a thorough inquiry.