परब फिटनेसचा सुजल पिळणकर ठरला 'मुंबई श्री'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 03:50 PM2018-02-19T15:50:11+5:302018-02-19T15:51:01+5:30

एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर.एम.भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली आणि आपल्या स्वप्नवत जेतेपदावर यशाची मोहोर उमटविली.

Sujal Palankar of Parab Fitness win 'Mumbai Shree' | परब फिटनेसचा सुजल पिळणकर ठरला 'मुंबई श्री'

परब फिटनेसचा सुजल पिळणकर ठरला 'मुंबई श्री'

Next

मुंबई - एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर.एम.भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली आणि आपल्या स्वप्नवत जेतेपदावर यशाची मोहोर उमटविली. तसेच फिजीक्स फिटनेस प्रकारात प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली. दृष्ट लागण्याजोगं झालेलं दिमाखदार आयोजन आणि शरीरसौष्ठवपटूंची पीळदार शरीरयष्टी पाहून तहानभूक विसरलेल्या तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींना मुंबई श्रीचा पीळदार आणि दमदार थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. 

बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनने दिलेल्या आयोजनाच्या संधीचे युवासेना आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने अक्षरशा सोने करून दाखविले. आयोजक आणि क्रीडाप्रेमी सिद्धेश रामदास कदम यांनी कुठेही आखडता हात न घेता आयोजनासह खेळाडूंवरही रोख पुरस्कारांची उधळण केली. स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजनाने मुंबई श्रीचा थरार पाहाण्यासाठी गर्दी करणाऱया क्रीडाप्रेमींची डोळे दिपले. काल ग्रोवेल्स मॉलमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी संघ निवडल्यामुळे सेंट्स लॉरेन्स हायस्कूलच्या पटांगणावर फक्त अव्वल आणि दमदार खेळाडूंचे पीळदार दर्शन मुंबईकरांना अनुभवायला मिळाले. प्रत्येक गटातून  निवडण्यात आलेले सर्वच खेळाडू आपापल्या गटांचे विजेते वाटत होते. जजेसने खेळाडूंच्या प्रत्येक पीळदार अंगाचे गुणात्मक निरीक्षण करून निकाल जाहीर केला आणि त्यांच्या निकालावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शिक्कामोर्तब केले. 55 किलो वजनीगटात संदेश सकपाळने गतगटविजेत्या नितीन शिगवणला मागे टाकले. शिगवणने गेल्यावर्षी या गटात बाजी मारली होती. 60 किलो आणि 65 किलो वजनी गटात विनायक गोळेकर आणि प्रतिक पांचाळने यश संपादले. प्रतिकने गेल्यावर्षीही यश मिळवले होते. 70 किलो वजनी गटात विघ्नेश पंडित सरस ठरला. 75 किलो वजनीगटात रोहन गुरवला धक्का देत आर.के.एमचा सुशील मुरकरने अव्वल ठरला. 80 किलो वजनी गटातही आर.के.एम.च्या सुशांत रांजणकरने अव्वल स्थान संपादले.

85 किलो वजनीगटात सुजल पिळणकरच्या कामगिरीपुढे गटातील सारेच फिके पडले. रसेल दिब्रिटो, अनिकेत देसाई, स्वप्निल मांडवकरचे काहीएक चालू शकले नाही. शेवटच्या दोन गटात सकिंदर आणि श्रीदीप गावडेने अव्वल स्थान पटकावले. पण हे दोघेही चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत सुजलसमोर कमी पडले. श्रीदीप सर्वोत्कृष्ट प्रगतीकारक खेळाडू ठरला तर सकिंदरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फिजीक्स फिटनेस प्रकारात

युवासेना आणि शिवतेजच्या या दिमाखदार सोहळ्याला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आवर्जुन भेट दिली आणि सिद्धेश कदम यांचे भरभरून कौतुकही केले. मुंबई श्रीच्या निमित्ताने मुंबईची खरी ताकद आणि तरूणाई मैदानात उतरली आहे. शिवसेना-युवासेना सदैवच तरूणांसोबत राहिली आहे आणि पुढेही राहील, असेही वचन युवासेनाप्रमुख ठाकरे यांनी दिले. या धमाकेदार मुंबई श्रीचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसुळ, पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम, माजी आमदार कॅ. अभिजीत अडसुळ, शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे, मदन कडू यांच्या उपस्थितीत पार पडला.

नोकरीचे बळ हवेय- सुजल पिळणकर

गिरणी कामगाराचा मुलगा असलेला सुजल पिळणकरला मुंबई श्री आपणच जिंकणार हा विश्वास होता आणि त्याने तो खरा करूनही दाखवला. गेले सात वर्षे व्यायामशाळेत घाम गाळणाऱया सुजलला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचवायचे आहे. मुंबई श्री हे त्याचे पहिले दमदार पाऊल आहे. मुंबई श्री पर्यंत मी अत्यंत खडतरप्रवास करून पोहोचलोय. या मोसमात सलग सहा स्पर्धा जिंकल्यामुळे मी फॉर्मात होतोच. या स्पर्धांच्या पुरस्काराच्या जोरावरच मी मुंबई श्रीची जोरदार तयारी करू शकलो. आता मला महाराष्ट्र श्री आणि भारत श्रीमध्येही चांगली कामगिरी करायचीय. पण जोपर्यंत माझ्या मेहनतीला बळ आणि प्रोत्साहन देणारी मला नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी स्वताला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. आमच्या खेळात सर्व सोंगं घेता येतात, पण पैशाचं घेता येत नाही. शरीरसौष्ठवासाठी पैशाचं ऑक्सिजन लागते. नोकरी लागली तरच मला ते मिळू शकेल.

Web Title: Sujal Palankar of Parab Fitness win 'Mumbai Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.