विदर्भ, मराठवाड्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले, ठिकठिकाणी पिके झाली आडवी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:41 AM2024-04-14T05:41:34+5:302024-04-14T05:43:10+5:30

उरल्यासुरल्या पिकांनाही तडाख्यांवर तडाखे.

Stormy rain lashed Vidarbha, Marathwada again, crops were damaged in places, trees were uprooted. | विदर्भ, मराठवाड्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले, ठिकठिकाणी पिके झाली आडवी

विदर्भ, मराठवाड्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले, ठिकठिकाणी पिके झाली आडवी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाला असून गारपीट आणि अवकाळी पावसाचा सलग फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटेही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. घरे आणि शाळांवरील पत्रे उडाली, विजा पडून पशुधनाचेही नुकसान झाले आहे. चंद्रपूर, परभणी, जालना, जळगाव, नंदूरबार आणि लातूर जिल्ह्यातही नुकसान आहे.  

दाेन दिवस ढगाळ वातावरण 
बुलढाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांत शनिवारी पहाटेपर्यंत पावसाने जाेरदार हजेरी लावली. यापुढे मात्र पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. दाेन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर तापमान अंशा-अंशाने चढेल, अशी शक्यता वर्तविली आहे.

अमरावतीत ५० झाडे पडली 
शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने अमरावती शहरासह जिल्ह्याला झोडपले. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, खापर्डे बगिचा, मुख्य बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन परिसरातील ५० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. जिल्ह्यांतील  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चिंता व्यक्त होत  आहे.  

नांदेडला पाचव्या दिवशीही फटका 
नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस होत आहे. शनिवारी पहाटेपासून अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने आंब्याची झाडे जमीनदोस्त झाली. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. देगलूर तालुक्यात विज पडल्याने दोन जनावरे दगावली. सुगाव येथे आंब्याची २५ ते ३० झाडे उन्मळून पडली आहेत. 

हिंगोलीत हळदीचे नुकसान 
हिंगोली जिल्ह्यात हळद काढणी अंतिम टप्प्यात असून, काढलेली हळद शेतात वाळायला ठेवली असली तरी पुन्हा पावसात भिजून जात आहे. इतर पिकेही मातीत गेली. 

सोलापुरात १८ गावांमध्ये नुकसान
मंगळवेढा तालुक्यात १० ते १२ एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल १८ गावांमध्ये पिके व घरांचे नुकसान झाले आहे. २५ घरांवरील पत्रे उडून गेली. वीज पडून तीन मोठी जनावरे दगावली. 

Web Title: Stormy rain lashed Vidarbha, Marathwada again, crops were damaged in places, trees were uprooted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.