Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane: “नितेश राणे हेच हल्ल्याचे मुख्य सूत्रधार”; राज्य सरकारचा हायकोर्टात मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:07 IST

Nitesh Rane: नितेश राणे यांच्यावरील आरोप सिद्ध करणारी माहिती प्रतिज्ञापत्रात सादर करू, असे मुंबई हायकोर्टाला सांगण्यात आले आहे.

मुंबई: शिवसेनेच्या संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला असून, तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश यांना तूर्तास अटक होणार नसून आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, या याचिकेवरील सुनावणीवेळी राज्य सरकार आणि पोलिसांनी नितेश राणे हेच या हल्लामागचे मुख्य सूत्रधार असल्याचा मोठा आरोप केला असून, या दाव्यासंदर्भात महत्त्वाची माहिती प्रतिज्ञापत्रात सादर करू, अशी माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. 

नितेश राणेंवर कोणतीही कठोर कारवाई करणार नाही

या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी घेणार असल्याचे न्या. सी.व्ही. भडंग यांनी निश्चित केले आहे. मात्र तोपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांचे वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाकडे केली. यावर सिंधुदुर्गपोलिसांनी पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, असे तोंडी आश्वासन उच्च न्यायालयात देण्यात आले आहे. त्यामुळे नितेश राणेंना पुढील सुनावणीपर्यंत तूर्तास अटकेपासून दिलासा मिळालेला आहे.

दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते. 

टॅग्स :नीतेश राणे राज्य सरकारपोलिसशिवसेनासिंधुदुर्गमुंबई हायकोर्ट