Join us  

युती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 8:09 AM

राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी दुष्काळ, बेरोजगारी अशा विविध मुद्दयांवर आक्रमक होणार असल्याचं स्पष्ट केलं.

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. शेतकरी, बेरोजगारी, दुष्काळ अशा विविध मुद्द्यांवरुन आक्रमक भूमिका घेत विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आल्याने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नव्या मंत्र्यांची दमछाक होताना पाहायला मिळू शकते. 

माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मेहता यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला असला तरी प्रकाश मेहतांवर गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी विरोधक अधिवेशनात लावून धरणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांची विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली. 

बैठकीनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुंडे म्हणाले की, भ्रष्ट मंत्र्यांना राज्यातील जनता येत्या अधिवेशनात वगळल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी दुष्काळ, बेरोजगारी अशा विविध मुद्दयांवर आक्रमक होणार असल्याचं स्पष्ट केलं. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात राज्यात आहेत. त्यामुळे बेरोजगार भत्ता राज्यातील तरुणांना द्यावा अशी मागणी अधिवेशनात करणार आहोत असं सांगितले. 

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पावसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल. तसेच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा होईल असं सांगितले. तसेच अधिवेशनात 13 नवीन विधेयक आणि विधान सभेतील प्रलंबित 12, विधान परिषदेतील प्रलंबित 3 अशी एकूण 28 विधेयक चर्चेला येणार आहेत अशी माहिती दिली. 

तसेच गेली 5 वर्ष सर्व समाजाला समोर ठेवून निर्णय घेतले. आव्हानांना सकारात्मकतेने पुढे गेल्यामुळे जनतेने विश्वास दाखविला. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलल्याने वैद्यकिय प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात यश आले आहे. धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला

आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याची घोषणा, मंत्र्यांचा परिचय, अध्यादेश पटलावर मांडणे आणि शोकप्रस्ताव असं दिवसभराच्या कामाकाजाचं स्वरुप राहणार आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसधनंजय मुंडे