सोशल मीडिया झाला 'धोनी'मय, भावूक चाहत्यांकडून भावना व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:33 PM2020-08-16T14:33:44+5:302020-08-16T14:34:27+5:30
'महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट विश्वातला एक ध्रुवतारा, जो अढळ आहे...' , 'माही बेस्ट कॅप्टन बेस्ट अॅण्ड सिंपल पर्सन', 'माही तू क्रिकेटमधून निवृत्त झालास, पण आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाहीस...
ठाणे : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्याच्या लाखो चाहत्यांनी व्हाॅटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून धोनीच्या क्रिकेटमधील कारकिर्दीतील काही महत्त्वाचे क्षण शेअर करत त्याबद्दल थँक यू आणि पुढील काळासाठी मिस यूचे मेसेज पोस्ट केले आणि पाहतापाहता सोशलमीडिया धोनीमय झाला. महेंद्रसिंग धोनीने शनिवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. खरंतर धोनी येता टी-२० वर्ल्ड खेळेल अशी सर्वांनाच आशा आणि त्याने खेळावा अशी अपेक्षा होती. मात्र धोनीने त्यापूर्वीच निवृत्ती जाहीर केल्याने अनेक फॅन्समध्ये नाराजी पसरली आहे. त्यांनी आपली नाराजी फेसबुक, व्हाॅटस्अॅप मेसेजेस, स्टेटसद्वारे जाहीर केली आहे.
'महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट विश्वातला एक ध्रुवतारा, जो अढळ आहे...' , 'माही बेस्ट कॅप्टन बेस्ट अॅण्ड सिंपल पर्सन', 'माही तू क्रिकेटमधून निवृत्त झालास, पण आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाहीस...' 'कॅप्टन कूल' , 'अविस्मरणीय कारकिर्द', 'दुसरा माही होणे नाही', 'लोग कहते हैं कि खेल से बड़ा कोई खिलाड़ी नहीं होता, लेकिन जब बात धोनी की आती हैं तो लोग भी खामोश हो जाते हैं',
'थॅंक यू, लव्ह यू अॅण्ड मिस यू माही फॉरएव्हर' असे मेसेजेस पोस्ट करून चाहत्यांनी त्याच्यावर असलेले प्रेम व्यक्त केले. तर धोनीने ज्या पद्धतीने निवृत्ती जाहीर केली त्याचीही सोशलमीडियावर चर्चा झाली. 'नो स्पेशल अनाऊंसमेंट, नो प्रेस कॉन्फरन्स, नो गुड बाय मॅच, नो फायनल स्पीच अॅण्ड यू प्रुव्ह अगेन यू आर कुल मॅन', 'युअर फेअरवेल इज अ ग्रेटेस्ट फेअरवेल' असे मेसेज नेटकऱ्यांनी पोस्ट करत माहीचे कतुक केले. तर धोनी आणि सुरेश रैना यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यातच धोनी पाठोपाठ रैनानेही क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्यांच्या मैत्रीचे दाखले देणारेही अनेक इमेजेस आणि मेसेजेस सोशल मीडियावर पोस्ट झालेले पाहायला मिळाले.