Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तुम्हाला अधिकार नाही; दोन झेंड्यांच्या घोषणेवर तावडेंचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:20 IST

राज्याचे मंत्री विनोद तावडेंनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अश्या लोकांना भगव्याला हात लावण्याचा अधिकार नाही असा टोला अजित पवारांना लगावला आहे. 

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये 'शिवरायांचा भगवा' आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार अशी घोषणा शुक्रवारी पाथरी येथील जाहीर सभेत केली होती. यावर राज्याचे मंत्री विनोद तावडेंनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अश्या लोकांना भगव्याला हात लावण्याचा अधिकार नाही असा टोला अजित पवारांना लगावला आहे. 

त्यांनी सांगितले की, “अजितदादा तुमच्याकडे एक झेंडा आहे, त्याचाच दांडा पकडायला माणसं राहिली नसताना दूसरा झेंडा कोण खांद्यावर घेणार? तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा घेऊन चालत नाही तर महाराजांनी जे शिकवलं आहे ते तुम्ही अंमलात आणार आहात का? असा प्रश्न देखील उपस्थित केला. त्याचप्रमाणे आपल्या काळात किती घोटाळे झाले हे विसरू नका आणि झेंडा मानाने, प्रेमाने व खंबीरपणे पकडणारा कार्यकर्ता राहिला पाहिजे असा टोला लगावला. 

अजित पवारांनी आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये 'शिवरायांचा भगवा' आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार आहेत अशी घोषणा अजित पवार यांनी पाथरी येथील जाहीर सभेत केली. सभेत बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका करत हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने पीक विमा मिळत नाहीय. देवेंद्र फडणवीस कधी देणार हमीभाव? कशाला शेतकर्‍यांना फसवताय असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला होता. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसविनोद तावडेभाजपा